Ashraf Azmi Sarkarnama
मुंबई

Mumbai Century Mill Land : सेंच्युरी मिलच्या जमिनीवरून काँग्रेस आक्रमक; ‘10 हजार कोटींचा फायदा कुणाला?’

Century Mill land lease proposal triggers a political row as Ashraf Azmi questions the potential ₹10,000-crore benefit : 6.17 एकर जमीन 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याच्या प्रस्तावाला अशरफ आझमींचा विरोध; 5 FSI आणि सुमारे 13 लाख चौ. फूट बांधकाम क्षमतेवर उपस्थित केले सवाल

Pradeep Pendhare

Century Mill Mumbai : मुंबईतील लोअर परळ येथील ऐतिहासिक सेंच्युरी मिलची 6.17 एकर जमीन 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने खासगी विकसकाला देण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.

महापालिकेतील काँग्रेस गटनेते अशरफ आझमी यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला असून, महापालिकेच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे (Congress) आझमी यांनी दावा केला की, या जमिनीवर विकसकाला 5 FSI देण्यात येत असून, त्यामुळे सुमारे 13 लाख चौरस फूट बांधकामाची क्षमता निर्माण होऊ शकते. त्यांच्या मते, प्रति चौरस फूट एक लाख रुपये दर गृहीत धरल्यास या विकासातून सुमारे 13 हजार कोटी रुपयांचे मूल्य निर्माण होते.

मात्र, महापालिकेला (BMC) या व्यवहारातून सुमारे 1,300 कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगत आझमी यांनी उर्वरित संभाव्य आर्थिक फायद्याबाबत प्रश्न उपस्थित केला. उर्वरित सुमारे 10 हजार कोटींचा फायदा नेमका कोणाला होणार? असा सवाल त्यांनी महापालिकेकडे केला.

सेंच्युरी मिलची ही जमीन मिळवण्यासाठी महापालिकेला सुमारे 70 वर्षे कायदेशीर लढा द्यावा लागला. जानेवारी 2025 मध्ये ही जमीन पालिकेच्या ताब्यात आल्याचा उल्लेख करत आझमी यांनी, एवढ्या प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर मिळालेल्या मौल्यवान जमिनीच्या वापराबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे म्हटले.

या जमिनीचा मूळ उद्देश गरीब नागरिक आणि गिरणी कामगारांना निवारा उपलब्ध करून देण्याशी संबंधित असल्याचा दावा करत आझमी यांनी गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला. ज्या गिरणी कामगारांनी मुंबई घडवली, त्यांनाच बेघर करून मुंबईबाहेर ढकलण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आझमी यांनी दिला.

आधी पुनर्वसन, मगच विकास, अशी भूमिका काँग्रेसची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सेंच्युरी मिलच्या जमिनीच्या प्रस्तावावरून आगामी काळात महापालिका आणि काँग्रेसमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आझमी यांनी केलेल्या 10 हजार कोटी रुपयांच्या संभाव्य फायद्याच्या दाव्याबाबत महापालिकेची अधिकृत भूमिका काय आहे, तसेच प्रस्तावातील आर्थिक अटी, FSI आणि विकासाच्या अटी नेमक्या काय आहेत, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT