BMC transfer controversy : मुंबई महापालिकेतील प्रशासकीय बदल्या आणि पदस्थापनांमध्ये राजकीय हस्तक्षेपाचा मोठा प्रकार समोर आला आहे.
महापालिकेतील तब्बल 225अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारशींचा वापर करण्यात आल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेच्या (BMC) शहर अभियंता कार्यालयाकडून मागवलेल्या माहितीनुसार, राजकीय नेत्यांच्या नावांचा थेट उल्लेख अधिकाऱ्यांच्या नावांसमोर आढळला आहे. यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता, कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नेत्यांच्या शिफारसपत्रांची संख्येत, सर्वाधिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. त्यांनी दहा जणांना शिफारस पत्रे दिली आहेत. यानंतर RPIचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नऊ, भाजप मंत्री गिरीश महाजनांची सात, कालिदास कोळंबकर सात, मंगेश कुडाळकर सहा, अण्णा बनसोडे सहा, तुकाराम काते सहा, मुरजी पटेल पाच आणि दिलीप लांडे यांनी पाच जणांसाठी शिफारस पत्रे दिली आहे.
याशिवाय राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ, सुमीत वानखेडे, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, इंद्रनील नाईक, संतोष बांगर, राम कदम, किसन कथोरे आणि बच्चू कडू यांच्या नावाने प्रत्येकी चार, तर भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, भरतशेठ गोगावले, उदय सामंत, रवींद्र वायकर, प्रवीण दरेकर यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या नावाने प्रत्येकी तीन शिफारशी यादीत नोंदवल्या गेल्या आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, अमोल खटाळ आणि सना मलिक या राजकीय दिग्गजांची नावेही यादीत आहेत.
महापालिकेतील बदल्या सेवाज्येष्ठता, कार्यक्षमता आणि पारदर्शक निकषांनुसार होणे अपेक्षित आहे; मात्र काही अधिकारी सोयीच्या बदलीसाठी राजकीय दबाव आणत असल्याचे या 225 जणांच्या यादीवरून स्पष्ट होत आहे. महापालिका आयुक्तांनी या दबावतंत्राचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.