

Rishikesh Shete attack Newasa latest news : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर भर बाजारात जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी नेवासा पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी 14 जणांना न्यायालयाने 31 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप वासवे करत आहेत.
नेवासा शहरातील मुख्य रस्त्यावरील फळविक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवरून हा वाद निर्माण झाला होता. गणपती चौकात ऋषिकेश शेटे यांच्या वाहनाला सुमारे 90 जणांच्या जमावाने घेराव घालत दगडफेक केल्याचा आरोप आहे. वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या तसेच चाकूने हल्ला केल्याचा गंभीर आरोप शेटे यांनी आपल्या फिर्यादीत (CRIME) केला आहे. या घटनेत हाताला चाकू लागून दुखापत झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
नेवासा शहरातील मुख्य रस्त्यावरील फळविक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी भाजपचे (BJP) ऋषिकेश शेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपंचायतीकडे निवेदन दिले होते. त्यानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना गणपती चौकात हा प्रकार घडल्याचे पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी असिफ पठाण, अब्बास बागवान, परवेज बागवान, अरबाज बागवान, सलमान ऊर्फ साहिल बागवान, अरबाज अफरोज बागवान, शोएब राजू बागवान, शाहरुख बागवान, फारुक बागवान, जुम्मा जहागीरदार, फरहान दाऊद बागवान, रिहान दाऊद बागवान, शाहरूख भाईसाब, मोसिम हणू बागवान, दाऊद बागवान, मोहसीन हनू बागवान, अज्जू मेहबूब बागवान, मोसिम अब्बास बागवान, मोहम्मद अब्बास बागवान, नवाब बागवान, शहीद शौकत बागवान, निसार अब्दुल बागवान, अरबाज बागवान यांच्यासह सुमारे 90 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर चुकीचा किंवा दिशाभूल करणारा कंटेंट प्रसारित केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी याबाबत माहिती दिली. शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दराडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) 2023 मधील कलम 168 अन्वये सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांसाठी प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत.
नेवासा पोलिस ठाण्याकडून यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून, त्यात पाच महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम 172 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिला आहे.
या प्रकरणात AIMIMचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. सोशल मीडियावरील संबंधित कंटेंटमुळे प्रकरणाला चिथावणी मिळाल्याचा आरोप करत, संबंधित सोशल मीडिया अकाउंट्स किंवा व्यक्तींविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नेवाशातील या घटनेनंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून, सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओंच्या माध्यमातून परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.