BMC Commissioner : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर शिक्कामोर्तब झाला आहे.
अश्विनी भिडे या आज पदाभार स्वीकारणार आहेत. अश्विनी भिडे मुख्यमंत्र्यांच्या अतिरीक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या.
राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर कोण बसणार याची चर्चा सुरू होती. यातच मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मर्जीतल्या 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्या नावावर निश्चिती झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई (Mumbai) महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे आज निवृत्त होणार आहेत. त्यांच्या ठिकाणी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती होणार आहे. अश्विनी भिडे 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी निभावली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी सायंकाळी बैठक झाली. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी दोन अधिकाऱ्यांची नावं चर्चेत होती. असिम गुप्ता आणि अश्विनी भिडे! मात्र अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.
अश्विनी भिडे यांच्या नावाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध होता. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बैठकीनंतर अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दोघांमधील बैठकीनंतर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या अधिकारी ओळखल्या जातात. मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रोजेक्टच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी निभावली आहे. मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे यांच्यासोबत मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता, संजय मुखर्जी यांचीही नावं चर्चेत होती. परंतु, या तीनही अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी निवड झालेल्या अश्विनी भिडे या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत. अश्विनी भिडे यांनी पूर्वी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची धुराही सांभाळली आहे. अश्विनी भिडे यांना आयुक्तपदाचा तीन वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळणार आहे. अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेतील महिलाराजचं वर्तुळ पूर्ण झालं आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रशासनावर सातत्याने भ्रष्टाचाराचे होत आहेत. अश्विनी भिडे या महिला अधिकाऱ्याकडे पहिल्यांदाच पूर्णवेळ महापालिकाचा पदभार आल्याने, प्रशासनाच्या कारभार सुधारण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. यात मुंबईतील शिवसेना ठाकरे आणि भाजपमधील राजकीय संघर्षात, प्रशासकीय समतोल राखण्याचं देखील आव्हान असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.