Mumbai Municipal Corporation deposits : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी नेहमीच राजकीय चर्चेचा विषय राहिला आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका, अशी बरुदावली मुंबई महापालिका या ठेवीच्या जोरावर मिरवते. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या या ठेवींमध्ये झपाट्याने घट होताना दिसत आहे.
गेल्या आठ महिन्यात मुंबई महापालिकेच्या ठेवीत तब्बल दोन हजार कोटींची घट झाल्याचे दिसून आले आहे. सातत्याने घटत चाललेल्या मुदत ठेवींमुळे मुंबई महापालिका प्रशासकीय कारभारावर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत आहेत.
मुंबई (Mumbai) महापालिकेकडे 2021-22 मध्ये 91 हजार 690.84 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. आता त्यात 12 हजार 192 कोटींची घट झाल्याने त्या 79 हजार 489.59 कोटी रुपयांपर्यंत घटल्या आहेत. यंदाचा अर्थसंकल्प जाहीर झाला तेव्हा या ठेवी 81 हजार कोटींवर होत्या. मात्र आता मागील आठ महिन्यांतच त्यात 2 हजार कोटींची घट झाल्याचे दिसून आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकारात मुंबई महापालिकेकडे गेल्या काही वर्षांतील मुदत ठेवींचा तपशील मागितला होता. मुंबई महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये असतात. विविध बँकांचे (Bank) व्याजदर मागवून सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये या ठेवी गुंतवल्या आहेत. दरम्यान, 79 हजार कोटीच्या मुदत ठेवींपैकी 39 हजार 543 कोटींची रक्कम पीएफ, निवृत्ती वेतन, उपदान, विशेष निधी आर्दीसाठी वापरणे बंधनकारक आहे.
मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 40 हजार 579 कोटी, एचडीएफसी बँकमध्ये 21 हजार 982 कोटी, आयसीआयसीआय बँकमध्ये 21 हजार 988 कोटी आणि युनियन बँक ऑफ इंडिया 12 हजार 528 कोटी रुपये आहेत.
मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणीमुळे या मुदत ठेवी झपाट्याने कमी होऊ लागल्या आहेत. दरम्यान मुदत ठेवीची रक्कम मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठीच वापरली जाते, असे अर्थसंकल्प मांडताना आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले होते.
सागरी किनारा प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता, मलनिस्सारण प्रकल्प, असे मोठ्या खर्चाचे आणि दीर्घकाळ चालणारे प्रकल्प यांच्यासाठी मुदत ठेवींमधील राखीव निधीशी संलग्न करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकल्पांची देणी देताना मुदत ठेवी कमी होत जात आहेत. पालिकेने गेल्या काही वर्षांपासून राखीव निधी वापरण्यास सुरूवात केल्याची देखील माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.