MNS Raj Thackeray On Legend of Maula Jat Film Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : पाकिस्तानी कलाकाराच्या चित्रपटाला राज ठाकरेंचा कडाडून विरोध; म्हणाले, कलेला देशांच्या सीमा नसतात, पण...

Jagdish Patil

Mumbai News, 22 Sep : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. फवाद खान नावाच्या पाकिस्तानी कलाकाराचा 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार आहे.

मात्र, कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा आता मनसेकडून देण्यात आला आहे. शिवाय पाकिस्तानी (Pakistan) कलाकारांचे सिनेमे भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत सरकारला आवाहन आणि थिअटर्स मालकांना इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, "फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' (Legend of Maula Jat) नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे.

कुठल्याच राज्यात हा सिनेमा प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे?

महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे. अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की", अशा शब्दात त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे.

तसंच, या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे.

अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे, असंही राज यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये, असा इशारा त्यांनी थिएटर मालकांना दिला आहे.

शिवया कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री असल्याचा विश्वासही त्यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या मागणीनंतर राज्यात फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होणार का नाही? आणि तो सिनेमा प्रदर्शित केलाच तर मनसे त्यावर काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT