Manoj Kotak Sarkarnama
मुंबई

Mumbai North East LokSabha Constituency : मुंबई उत्तर-पूर्वमधून मनोज कोटक यांच्यासमोर किरीट सोमय्यांचा अडसर ?

Anand Surwase

Lok Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांत आपले उमेदवार देण्यासाठी भाजपकडून चाचपणी सुरू आहे. यातील तीन लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातच आहेत. उर्वरित तीनपैकी दोन मतदारसंघ हे शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाकडे आणि एक ठाकरे गटाकडे आहे. दरम्यान, भाजपच्या ताब्यातील मुंबई उत्तर-पूर्व या मतदारसंघाचे खासदार मनोज कोटक हे पुन्हा एकदा याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारणारे मनोज कोटक हे राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी मुंबई महापालिकेत सलग तीन टर्म नगरसेवक होते. त्यादरम्यान त्यांनी महापालिकेच्या विविध समित्यांवर काम केले आहे. ते महापालिकेच्या स्थायी समितीचेही सदस्य होते. याशिवाय त्यांनी भाजपचे गटनेते म्हणूनही काम पाहिले आहे.

2019 मधे मनोज कोटक यांना थेट खासदारकीची लॉटरी लागली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून खासदार झालेल्या किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने विरोध केला होता. त्यामुळे सोमय्या यांचा पत्ता कट करून भाजपने कोटक यांना संधी दिली होती.

गुजराती कुटुंबातून आलेले कोटक एक व्यावसायिक आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच सोमय्या यांचा पत्ता कट झाल्यानंतर नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना थेट लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी फडणवीस यांनीच प्रयत्न केल्याचे बोलले जाते. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत मुंबई उत्तर-पूर्व या मतदारसंघातून कोटक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मनोज कोटक यांना 5,14,599 मते मिळाली. राष्ट्रवादीचे संजय दीना पाटील यांना 2,88,113 मते मिळाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये कोटक यांनी मतदारसंघाच्या विकासकामांवर भर दिला. मतदारांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आगामी निवडणूक लढवण्यासाठी कोटक इच्छुक आहेत. मात्र, यावेळी उमेदवारीसाठी त्यांना संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

कारण भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हेदेखील आगामी लोकसभा निवडणूक याच मतदारसंघातून लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज कोटक यांनी दोनवेळा विधान परिषदेवर निवडून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते शक्य झाले नव्हते. भांडुप विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

नाव (Name) :

मनोज किशोर कोटक

जन्मतारीख (Birth Date) :

25 डिसेंबर 1972

शिक्षण (Education) :

दहावी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background) :

मनोज कोटक यांचा जन्म राजकोटमध्ये झाला. त्यांचे कुटुंब मुंबईतच वास्तव्याला आहे. मनोज कोटक यांच्या वडिलांचे नाव किशोर कोटक, तर मातोश्रीचे नाव कुसुम कोटक. मनोज कोटक यांच्या पत्नीचे नाव सीमा असे असून, त्यांना दोन मुले आहेत. मनोज कोटक यांचे शिक्षण दहावी झाले असून ते राजकारण आणि समाजकारणाव्यतिरिक्त व्यावसायिक आहेत.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business) :

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency) :

मुंबई उत्तर-पूर्व

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation) :

भाजप

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey) :

मनोज कोटक यांचा राजकीय प्रवास 1989 मध्ये भाजप युवा मोर्चाचे वाॅर्ड अध्यक्ष या पदापासून सुरू झाला. 2007 पर्यंत त्यांनी पक्ष-संघटनेत विविध पदांवर काम केले. 2007 मध्ये ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 2019 पर्यंत सलग तीन टर्म ते नगरसेवक होते. त्यांनी पालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले.

2019 मध्ये त्यांना थेट खासदारकीची लॉटरी लागली. 2014 ला प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या किरीट सोमय्यांचा पत्ता शिवसेनेमुळे कापला गेला होता. खासदार होण्यापूर्वी कोटक यांनी दोन वेळा विधान परिषद निवडणूक लढवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी लॉबिंगदेखील केले होते. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. तसेच 2014 मध्ये त्यांनी भांडुप विधानसभा मतदारसंघातूनही विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency):

मनोज कोटक हे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात आलेले आहेत. नगरेसवक असल्यापासून ते विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. दिव्यांगांच्या समस्या सोडवणे, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे, रोजगार मेळाव्यांचे आयोजन त्यांनी केले. स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, पर्यावरण बचाव, नेत्रतपासणी, रक्तदान, कर्करोग जनजागृती, आरोग्य तपासणी शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप, असंघटित कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी उपक्रम ते राबवतात.

खासदार निधीतून त्यांनी मतदारसंघात विविध सामाजिक संस्थांना हातभार लावला आहे. स्वयंरोजगार योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केले. वेळेवर न धावणाऱ्या मध्य रेल्वेचा मुद्दा, वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी अधिक सीएनजी स्टेशन्सची मागणी, इमारतींमधील काचेच्या दर्शनी भागाचे धोके, असे सार्वजनिक महत्त्वाचे विषय त्यांनी संसदेत मांडले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मल्टी-मॉडल वाहतूकव्यवस्था उभारण्याच्या कामाला गती देण्यासंदर्भात त्यांनी आग्रही भूमिका घेतली.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election):

कोटक यांनी 2019 ची निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांचा त्यांनी पराभव केला.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election):

2019 च्या निवडणुकीवेळी युतीतील शिवसेनेने किरीट सोमय्या यांना उमेदवारी न देण्याची अट घातली होती. ती अट मान्य करत भाजपने ऐनवेळी मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली होती. मनोज कोटक यांच्यासाठीही लॉटरीच होती. त्यातच भाजपने शब्द पाळल्यामुळे शिवसेनेनेदेखील मनोज कोटक यांच्यासाठी शिवसैनिकांना कामाला लावले. त्यावेळी विक्रोळीचे आमदार राऊत यांनी एक व्हिडीओच्या माध्यमातून कोटक यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले होते.

त्याचा फायदा मनोज कोटक यांना झाला. याशिवाय ईशान्य मुंबईत शिवसेनेची पारंपरिक व्होट बँक मोठ्या प्रमाणावर आहे. या मतदारसंघात गुजराती मतदारांचीही संख्या मोठीआहे. हा मतदार नेहमीच भाजपच्या बाजूने राहिला आहे. त्यातच किरीट सोमय्या यांनी या मतदारसंघात विविध विकासकामे केली होती. त्याचाही फायदा मनोज कोटक यांना झाला. गुजरातीबहुल मुलुंड विधानसभा मतदारसंघातून कोटक यांना 1,27,847 मते मिळाली होती, तर पाटील यांना फक्त 40,484 मते मिळाली होती.

दुसरीकडे संजय कोटक यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संजय पाटील मैदानात होते. मात्र मुंबईत राष्ट्रवादीची म्हणावी तशी ताकद अद्यापही नाही. त्यातच 2014 मधील मोदीलाटेचा न ओसरलेला प्रभाव, पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारताने पाकिस्तानला दिलेल्या उत्तराचे भांडवल भाजपने केले होते. त्याचाही फायदा कोटक यांना झाला.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency) :

गुजराती कुटुंबातील असले तरी मनोज कोटक यांचे बालपण मुलुंडमध्ये मराठी वसाहतीमध्येच गेले. त्यामुळे कोटक हे गुजराती आणि मराठी संस्कृतीमध्ये एकरूप झाले आहेत. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात गुजराती आणि मराठी भाषिक दोन्ही मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच कोटक यांचे मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. त्यामुळे दोन्ही भाषिक मतदारांमध्ये कोटक यांचा जनसंपर्क अत्यंत प्रभावी आहे.

याशिवाय ते मतदारसंघात सातत्याने विविध उपक्रम राबवून लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. ते गेल्या 10 वर्षांपासून नियमितपणे "प्रेरणा रास" सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, "शहीद परिवार गौरव समारंभ"च्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करतात. या कार्यक्रमासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती दिसून येते. याचसोबत नियमितपणे हिंदी कविसंमेलनाचे आयोजन, तरुणांसाठी कबड्डी स्पर्धा, बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप, क्रिकेट टुर्नामेंट आणि कुस्ती स्पर्धाचे आयोजन करीत कोटक हे मतदारांमध्ये सातत्याने सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतात.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles) :

ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती, मतदारसंघातील विकासकामे, गाठीभेटी, दौरे याबाबतची माहिती ते सोशल मीडयाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून शेअर करतात. त्यांची स्वत:ची राजकीय मते, आरोप-प्रत्यारोप यावर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसून येतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्य (Political Statements made by Candidate) :

मनोज कोटक हे भाजपच्या आक्रमक नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करणे नेहमीच टाळले आहे. विरोधकांवर टीका, आरोप करून आपला आक्रमकपणा त्यांनी अनेकवेळा दाखवून दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांनंतरही महाविकास आघाडी सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नव्हता.

त्यावेळी महाविकास आघाडी सरकारवर दाऊचा प्रभाव आणि दबाव असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला होता. सैफअली खानच्या तांडव या वेबसिरीजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचा मुद्दा पुढे करीत त्या वेबसिरीजर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru) :

किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate) :

पहिल्यांदाच खासदार झालेल्या कोटक यांनी संधीचे सोने करीत मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला. नगरसेवक म्हणून तीन टर्म काम पाहिलेल्या कोटक यांना जनतेचे मूलभूत प्रश्न काय आहेत आणि त्यातील केंद्राच्या अखत्यारित कोणकोणते आहेत, याची चांगलीच जाण होती. त्याअनुषंगाने त्यांनी मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या अनुभवाचा उपयोग करीत संपूर्ण खासदार निधी विकासकामांसाठी वापरला.

त्यामुळे मतदारसंघातून त्यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले जाते. कोटक हे मराठी आणि गुजराती भाषिक असल्याने त्यांचा मतदारसंघातील प्रभावी जनसंपर्क ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जाते. ते देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातील नेते म्हणून ओळखले जातात. मुंबई उत्तर-पू्र्व मतदारसंघातील मुलुंड विधानसभा मतदारसंघातील गुजराती भाषिकांचे संख्याबळ हे कोटक यांच्यासाठी एकगठ्ठा लाखांपेक्षा जास्त मतांचा खजिना आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate) :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनोज कोटक हे इच्छुक आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती बदललेली आहे. भाजप युतीमध्ये यावेळी शिवसेनेचा शिंदे गट सहभागी आहे. त्यामुळे शिवसेनेची पारंपरिक मते यावेळी पूर्ण क्षमतेने मिळणार नाहीत. त्यातच उद्धव ठाकरे गटाला मिळत असलेल्या सहानुभूतीचा फटकादेखील आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

कोटक हे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी सरकारविरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढत कारवाई करायला भाग पाडणारे किरीट सोमय्या यांच्या योगदानाकडे भाजप दुर्लक्ष करणार नाही. यावेळी किरीट सोमय्या हेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून कोटक यांना तिकीट देण्यात सोमय्यांचा अडथळा निश्चितच निर्माण होणार आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences):

मनोज कोटक यांची खासदार म्हणून 2019 ची पहिलीच टर्म पूर्ण होत आहे. तत्कालीन परिस्थितीत शिवसेना-भाजप युती करताना शिवसेनेने काही अटी घातल्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेवर वारंवार टीका करणाऱ्या सोमय्या यांना मुंबई उत्तर मतदारसंघातून उमेदवारी न देण्याची एक अट घालण्यात आली होती. त्यामुळे ऐनवेळी मनोज कोटक यांना संधी मिळाली.

मात्र आताची राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यातच भाजपकडूनही धक्कातंत्राचा वापर केला जात आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पारचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे स्थानिक सर्वेक्षणानुसार उमेदवारनिश्चिती केली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार मुंबईतदेखील भाजपकडून उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर उमेदवारी नाकारली गेल्यास कोटक यांना पक्षाचा निर्णय मान्य करावा लागेल. लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यास त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, सद्यःस्थितीत कोटक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT