मुंबई : मागील काही महिन्यांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी करत आहेत. त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणांकडून अनेकांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. आता एका प्रकरणात सोमय्यांच्या मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) याबाबत चौकशी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे समजते.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही चौकशी सुरू केली आहे. वसई येथे जमीन खरेदी केल्याप्रकरणी नीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. EOW ने या प्रकरणातील तक्रारदाराचे जबाबही नोंदवले आहे. नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवन यांच्यात संबंध असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. तसेच राऊतांनी ''बाप-बेटे लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचे ट्विट काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यातच आता मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी कंबर कसल्याने चर्चांना ऊत आला आहे.
'नील सोमय्यांनी पीएमसी बँकेचे पैसे आपल्या प्रकल्पात वापरले असून बाप बेटे दोघेही जेलमध्ये जातील,' असा गंभीर आरोप राऊतांनी केला होता. शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला होता. नील सोमय्या यांनी निकॉन इन्फ्राच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, आम्ही कुठल्याही न्यायालयात जाणार नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.
दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपानंतर नील सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीनासाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांची याचिका फेटाळल्यानंतर नील सोमय्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यांनी मागे घेतली आहे. 'राज्य सरकार सोमय्या यांच्या विरोधात सध्या कोणत्याही प्रकारची चौकशी करत नाही,' अशी माहिती राज्य सरकारने त्यावेळी दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.