Vasai Virar politics Sarkarnama
मुंबई

BJP Mumbai politics : विधान परिषदेसाठी वसई-विरारमध्ये ‘हायव्होल्टेज’ हालचाली! सवरा-पाटील भेटीमागे नेमकं काय शिजतंय?

BVA leader growing ties with BJP and Ekanath Shinde Shiv Sena spark fresh political equations ahead of Maharashtra Legislative Council elections : एकनाथ शिंदे शिवसेनेकडून क्षितिज ठाकूरांना उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच भाजपने बविआचे नेते राजीव पाटील यांची ‘सदिच्छा भेट’, घेताच वसई-विरारच्या राजकारणात पडद्यामागे मोठी हालचाल?

Pradeep Pendhare

Maharashtra Legislative Council election : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारच्या राजकारणात अचानक हालचालींना वेग आला असून, बहुजन विकास आघाडी (बविआ) आणि महायुतीतील वाढत्या संपर्कांमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.

बविआचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषद उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा सुरू असतानाच भाजपचे खासदार हेमंत सवरा यांनी बविआचे नेते तथा माजी महापौर राजीव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या भेटीत भाजपचे (BJP) आमदार राजन नाईक आणि वसई-विरार महापालिकेतील विरोधी पक्षनेते मनोज पाटील हेही उपस्थित होते. अधिकृतरीत्या ही ‘सदिच्छा भेट’ असल्याचे सांगण्यात आले असले, तरी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे बविआच्या राजकारणाभोवती नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर क्षितिज ठाकूर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता भाजपकडून राजीव पाटील यांच्याशी वाढलेला संपर्क पाहता, महायुतीतील दोन्ही पक्ष वसई-विरारमध्ये स्वतंत्र राजकीय गणित मांडत असल्याचे संकेत मिळत आहेत.

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर राजीव पाटील सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असल्याचे चित्र होते. महापालिका निवडणुकीच्या प्रचारातही त्यांची विशेष उपस्थिती दिसली नव्हती. त्यामुळे भाजपकडून त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

भाजपचे आमदार राजन नाईक यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, विधान परिषद उमेदवारीसंदर्भातील सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. आम्हाला जो उमेदवार दिला जाईल, त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करू. राजीव पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

दरम्यान, राजीव पाटील यांनी विधान परिषद उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले. नालेसफाई, रेल्वे समस्या यांसारख्या स्थानिक प्रश्नांवर खासदारांसोबत चर्चा झाली. भाजप आणि शिंदे शिवसेनेत माझे अनेक मित्र आहेत. क्षितिज ठाकूर यांना जर शिवसेनेकडून संधी मिळाली तर ती चांगली बाब आहे, असे ते म्हणाले.

तसेच, भाजप मला मोठा नेता समजत असेल तर ते माझे भाग्य आहे; मात्र मी स्वतःला मोठा नेता मानत नाही, असे म्हणत त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. आता विधान परिषदेसाठी महायुतीतून उमेदवारी नेमकी भाजप देणार की शिंदे शिवसेना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातही ठाकूर विरुद्ध पाटील या नावांपैकी अंतिम ‘लॉटरी’ कोणाला लागणार, याची उत्सुकता वसई-विरारच्या राजकारणात शिगेला पोहोचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT