Mumbai News: आगामी बहुचर्चित मुंबई महापालिकेसाठी भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे, काँग्रेस, अजित पवार-शरद पवारांची अशा दोन्ही राष्ट्रवादींसह सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील मनसेच्या एन्ट्रीसाठी पूर्ण वजन वापरलं आहे. शरद पवारांनीही राज ठाकरेंना सोबत घेण्यास सहमती दर्शवली आहे. पण काँग्रेसनं केलेल्या तीव्र विरोधामुळे मनसेची (MNS) आघाडीतील एन्ट्री वेटिंगवर पडली आहे. मात्र, काँग्रेसनं कितीही विरोध केला तरी मनसेला सोबत घेण्याशिवाय मविआला पर्यायच नसल्याचं समोर आलं आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीशी टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आधीच राज ठाकरेंसोबत जुळवून घेतले आहे. पण आता त्यांची धडपड ही राज ठाकरेंच्या मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी सुरू आहे. मात्र, राज ठाकरेंनी गेल्या काही निवडणुकांमध्ये घेतलेली कडवट हिंदुत्वाकडे झुकलेली भूमिका, मनसेचं मशिदीवरील भोग्यांविरुद्धचं आंदोलन हे काँग्रेसला खटकलं असून त्याचमुळे मनसेच्या मविआतील एन्ट्रीला विरोध सुरू आहे. पण मनसेला सोबत घेतलं,नाही तर महाविकास आघाडीचा आगामी मुंबई महापालिकेत मोठा गेम होऊ शकतो.
विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीची आकडेवारी पाहिल्यास मनसेला सोबत घेतलं तर महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 22 वॉर्डात मनसेच्या मतांचा महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल असं चित्र दिसून येत आहे. खरंतर मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांपैकी 67 प्रभागांमध्ये मनसेच्या उमेदवारांनं विजयी मताधिक्यापेक्षा अधिकची मतं मिळवली आहेत.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील वरळी, दादर, माहीम, घाटकोपर,दिंडोशी-मालाड, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले, भांडुप, चांदिवली यांसह आणखी काही प्रमुख भागांत मनसेचा अजूनही मोठा 'अंडरकरंट' असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. या भागांमधून मनसेच्या (MNS) उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यंत मतं मिळवल्याचं स्पष्ट झालं होतं.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेच्या ताकदीची जाणीव असणार आहे. म्हणूनच ते मनसेबाबत सकारात्मक आहे. पण कितीही नाकारलं तरी आधीच अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या काँग्रेसला (Congress) आपला विरोध बाजूला ठेवून मनसेशी जुळवून घ्यावंच लागणार आहे. अन्यथा काँग्रेससह मविआचीही वाट मुंबई महापालिकेत खडतर राहणार आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे मुंबईत एकत्र आल्यास 39 प्रभागांमध्ये मतांची समीकरणं निर्णायक ठरू शकतात. याचं कारण म्हणजे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं मुंबईतील 25 जागा लढवल्या होत्या,त्यापैकी मराठी मतदारांचा प्रभाव असलेल्या भागात मनसे उमेदवारांनी 4 टक्के मतं घेतल्याचं आकडेवारीत पाहायला मिळतं.
मुंबईतील मनसेचा विधानसभा निवडणुकीत 10 प्रभागांमध्ये मतांचा आकडा हा विजयी मताधिक्याच्या जवळपास जाणारा होता. तर मनसेच्या उमेदवारांनी 25 प्रभागांमध्ये मविआला मिळालेल्या मतांच्या 50% हून अधिक जास्त मतं मिळवली होती. तसेच 37 प्रभागांमध्ये मनसेच्या मतांचा वाटा 30 ते 49 टक्क्यांपर्यंत असल्याचं दिसून आलं होतं.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मनसेनं 7 पैकी 6 प्रभागांमध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतं घेतली होती.
या मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 43 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारानं महायुतीच्या उमेदवारावर 1 हजार 88 मतांची आघाडी तर मनसेच्या उमेदवारानं 1 हजार 728 मतं मिळवल्याचं दिसून आलं होतं.
वांद्रे पूर्वमधील वॉर्ड क्रमांक 92 मध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातला मतांचा फरक 623 होता, तर मनसेच्या उमेदवाराला 1 हजार 04 मतं होती.
जोगेश्वरी पूर्वमधील वॉर्ड क्रमांक 57 मध्ये महायुतीच्या उमेदवाराला मविआच्या उमेदवारापेक्षा 482 मतांची आघाडी होती. तर याच वॉर्डात मनसेच्या उमेदवारानं 918 मते होती.
विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 121 मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मतांचा फरक केवळ 843 होता; तर मनसेच्या उमेदवाराला 1 हजार 96 मतं मिळाली होती.
दिंडोशीमध्ये वॉर्ड क्रमांक 42 - भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 9,035, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस 7,371, मनसे 2,972
भांडुप पूर्वमध्ये (E) वॉर्ड क्रमांक 109 - भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 10,039, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस 5,927 तर मनसे 2,863
भांडुप (W) वॉर्ड क्रमांक 113 - भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 10,481 , उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस 8,781 तसेच मनसे 2,665 मतं पडली होती.
घाटकोपर (W) वॉर्ड क्रमांक 123 - भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना
11,051,उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस 9,350 आणि मनसे 5,881
घाटकोपर (E) वॉर्ड क्रमांक 125 - भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 12,980, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस 10,446 आणि मनसे 5,196
अणुशक्ती नगर वॉर्ड क्रमांक 144 - भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 6,345, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस 4,618, मनसे 4,949
माहीम वॉर्ड क्रमांक 192 - भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना
9,399 ,उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस 6,146, मनसे 6,392
माहीम वॉर्ड क्रमांक 190- भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 9,196, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस 7,324, मनसे 7,115 अशा अनेक वॉर्डमध्ये मनसे निर्णायक भूमिका बजावू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.