Sharad Koli-Sandeep Deshpande Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politic's : देशपांडेंचा कोळींवर पलटवार : ‘माझी बायको MPSC पास होऊन सरकारी नोकरीत आलीय, कोणाच्या मेहेरबानीमुळे नाही; रेडलाईन पाळा, अन्यथा...’

Sandeep Deshpande Vs Sharad Koli : संदीप देशपांडे, तुमची उंची तेवढी नाही, तुम्ही छोटेसे कार्यकर्ते आहात, तुम्ही असं बोलायला जाऊ नका. तुमच्यापेक्षा आम्हाला चांगलं बोलायला येते, आम्ही बोलल्यानंतर तुमची झोप उडेल.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 24 June : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या मुद्यावरून सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या जोरदार जुंपली आहे. ही पक्षातील नेते एकत्र येण्याबाबत बोलण्याऐवजी एकमेकांना इशारे देत आहेत. शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी केलेली टीका जिव्हारी लागल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही तेवढ्याच कडक शब्दांत कोळींना सुनावले आहे. ‘आम्ही रेडलाईन पाळली आहे, तुम्हीही पाळा. आम्ही रेडलाईन पाळायची सोडली, तर खूप वेगळ्या गोष्टी घडतील, असा इशाराच देशपांडे यांनी शिवसेना नेत्यांना दिला आहे.

शरद कोळी म्हणाले, संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) हे मनसेचे नेतेच नाहीत. त्यांनी मनसेचे पद घेतले आणि भाजपचं काम करत आहेत. देशपांडे यांच्या पोटात आता दुखायला लागलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार म्हटल्यावर भाजपनं त्यांना कामाला लावलं आहे, म्हणून देशपांडेंच्या तोंडून भाजपची भाषा निघत आहे.

राज्यातील जनता, शिवसैनिक, मनसैनिक या सर्वांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत, असं वाटतं. पण देशपांडे यांना ते एकत्र येऊ नयेत, असं वाटतं. परंतु देशपांडे या कावळ्याने कितीही शाप दिला तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणारच आहेत, असा दावाही शरद कोळी (Sharad Koli) यांनी केला आहे.

ते म्हणाले, संदीप देशपांडेंना आता भाजपने कामाला ठेवले आहे. दररोज उठून काहीतरी बोलायचं आणि दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये दरी निर्माण होईल, असे ते बघत आहेत. पण दोन्ही भाऊ एकत्र येणार म्हणजे येणारच, हे शिवसैनिकांच्या आणि मनसैनिकांच्या मनात असल्यामुळे आता देशपांडे यांना कोणीही विचारणार नाही, असेही कोळी म्हणाले.

देशपांडे, तुमची उंची तेवढी नाही, तुम्ही छोटेसे कार्यकर्ते आहात, तुम्ही असं बोलायला जाऊ नका. तुमच्यापेक्षा आम्हाला चांगलं बोलायला येते, आम्ही बोलल्यानंतर तुमची झोप उडेल. देशपांडे यांच्या मागे शिंदे गट आणि भाजप आहे. भाजपची स्क्रीप्ट देशपांडे वाचून दाखवत आहेत, त्यांना आमची विनंती आहे की, दोन्ही भावाला एकत्र येऊ दे. त्यांची युती होऊ दे, त्यांचं चांगलं चालू दे. तू त्यांचे वाटोळे करायच्या भानगडीत पडू नको. तू तुझी लायकी शिवसैनिक आणि मनसैनिक दाखवतील, तेव्हा तू पुढील काळात गप्प बसण्याचे काम करावं, असा सल्लाही कोळींनी देशपांडेंना दिला आहे.

संदीप देशपांडे यांनीही कोळींवर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, पक्षाची भूमिका मांडताना आमच्यावर टीका करणारे कोण आहेत. सोशल मीडियावर सर्व गोष्टी येतात, त्या ठिकाणी मला भाजपचा दलाल आहे. असं बरंच काही असतं. ज्यांच्यासोबत मी १९ वर्षे राहिलो, त्या राज ठाकरेंच्या मनात माझ्याविषयी काय आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे असल्या भुंकणाऱ्या कुत्र्यांबाबत मला विचार करण्याची गरज नाही.

शरद कोळीसारखी लोकं, ज्यांनी आयुष्यात कायम महिलांचा अनादर केला आहे. ते आता माझ्या बायकोबद्दल, कुटुंबाबद्दल बोलायला लागले आहेत. एवढं शिवसेनेच्या लोकांना वैफल्य आले आहे की, ते आता माझ्या कुटुंबावर यायला लागले आहेत. राजकारणावेळी मी राजकीय व्यक्तीबद्दलच बोललो आहे, कोणाच्या कुटुंबाबद्दल बोललो नाही. सगळ्यांनी ही रेडलाईन पाळली पाहिजे.

देशपांडे म्हणाले, माझी बायको राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन सरकारी सेवेत आहे. ती काँग्रेसच्या काळातही सरकारी सेवेत होती, ती उद्धव ठाकरे आणि आता भाजपच्या काळातही आहे. ती दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मेरिटमध्ये आली होती. ती कोणाच्या तरी मेहेरबानीमुळे नोकरी करतेय, हे जे कोळी म्हणाले आहेत, त्यातून कोळी आणि शिवसेनेच्या महिलांबाबतच्या वृत्तीचे दर्शन घडते.

आम्ही आजपर्यंत कोणाच्याही कुटुंबावर गेलेलो नाही, हे शिवसेनेने भान बाळगावे. आम्ही रेडलाईन पाळली आहे, तुम्ही पाळा. आम्ही रेडलाईन पाळायची सोडली तर खूप वेगळ्या गोष्टी घडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

एकत्र येण्याबाबत उद्धव आणि राज ठाकरे यांनी बोललं पाहिजे. मग बाकीचं का बोलत आहेत. पण अशा बोलण्याने काही होणार नाही. जोपर्यंत हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलणार नाहीत. तोपर्यंत एकत्र येण्याची घटना घडू शकणार नाही, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT