मुंबई : अर्थसंकल्पात सामान्य जनता, शेतकऱ्यांना भोपळा मिळाला असून मोजक्या उद्योपती मित्रांसाठी भरपूर सवलतींची खैरात देण्यात आली आहे. एकूणच केंद्रीय अर्थसंकल्पाला ना दिशा ना अर्थ, पूर्णपणे भरकटलेला अर्थसंकल्प,अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र डागले आहे. (Nana Patole criticized on Union Budget 2022)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज अर्थसंकल्प २०२२-२३ जाहीर केला. यात अर्थव्यवस्थेला गती देण्यासासह देशभरातील रस्ते, रेल्वे (Railway) व इतर दळणवळणाच्या सुविधा, शेती क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. पीएम गतीशक्ती इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अंतर्गत या सुविधांचा चेहरामोहरा बदलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मात्र, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे. तसेच, अर्थसंकल्पातील त्रुटीकडेंही लक्ष वेधले आहे. अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता, नोकरीचे स्वप्न पाहणारा तरुणवर्ग यांना काहीही स्थान देण्यात आले नाही. कार्पोरेट टॅक्ससह अनेक सवलतींचा वर्षाव उद्योगक्षेत्रावर केला असला तरी आयकर मर्यादेत काहीही बदल न केल्याने प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांची पुन्हा एकदा निराशा केली आहे.
''शेतकरी देशाचा कणा आहे. दिल्लीच्या सीमेवर एक वर्ष शेतकरी आंदोलन चालले. शेतकऱ्यांच्या हक्काचा एमएसपी थेट जमा करणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. पण एमएसपीचा कायदा करण्याबाबत काहीच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. एमएसपीच कमी आहे तो वाढवण्यात आलेला नाही. खते, बियाणे, डिझेलचे वाढलेले दर, महागाई व शेतमालाला मिळणारा भाव याचा विचार करता शेतकऱ्यांच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही आले नाही. शेती औजारांवर जीएसटी लावून आधीपासूनच लूट सुरु आहेच. किसान सन्मान निधीच्या नावाने वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात, परंतु २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, त्याबाबत स्पष्ट काहीही केलेले नाही.
देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन होते. परंतु प्रत्यक्षात ३ कोटी पेक्षा जास्त नोकऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात कमी झाल्या. सरकारी नोकर भरती होत नाही, या पार्श्वभूमीवर ६० लाख रोजगाराचे आकडे हे २ कोटी नोकऱ्यांच्या आकड्यासारखे फसवे व तरुणांची निराशा करणारे आहेत, अशी घणाघाती टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.
आयकर मर्यादेत सहा वर्षांपासून बदल कऱण्यात आलेला नाही, महागाईत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. उत्पन्न घटले आहे, गरिबांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामानाने या घटकाला दिलासा देणारी एकही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. जनतेच्या हातात पैसा आला तरच बाजारात तेजी येईल, पण उत्पन्न वाढीचे कोणतेच धोरण अर्थसंकल्पात दिसत नाही.
देशाची संपत्ती काही मोजक्या उद्योगपतींच्या घशात कशी जाईल, यासाठी प्रयत्न केलेला दिसत आहे. सब का साथ, सब का विश्वास ही घोषणा फक्त घोषणाच असून त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत नाही. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारमन वारंवार आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत होत्या पण त्या ज्या टॅबच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर करत होत्या त्या टॅबची निर्मितीही भारतात झालेली नाही.
अमृत महोत्सवी वर्षातील अर्थसंकल्पात देशातील जनतेला अमृताचा अनुभव मिळेल असा दावा केला जात पण देशातील सध्याची आर्थिकस्थिती, सरकारने दावा केलेले आकडे, महागाई, देशाची संपत्ती विकण्याचा सपाटा पहाता देश प्रगतीकडे जाण्याऐवजी अधोगतीकडेच वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. अर्थसंल्पात नवीन काहीही नाही, अमृताचा अनुभव तर होत नाही पण या अर्थसंकल्पातून शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार, तरुणवर्गासह सर्व घटकाची घोर निराशा झाली असून देशातील जनतेला यापुढेही कठीण परिस्थीतीला तोंड द्यावे लागेल, असे दिसते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.