Narayan Rane and Nitesh Rane

 

Sarkarnama 

मुंबई

नारायण राणेंनी नगरपालिका निवडणुकाही गांभीर्याने घेतल्यात.. सिंधुदुर्गातच मुक्काम ठोकणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा बॅंक आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg) सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा बँक व चारही नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, (Narayan Rane) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) या तिघांनीही या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत. खुद्द नारायण राणे हे जिल्हा बँक व चार नगरपंचायत निवडणुका संपेपर्यंत जिल्ह्यात राहणार आहेत.

या दरम्यान आपण दोन दिवस जाऊन येणार. चारही नगरपंचायत क्षेत्रात आपण दौरा करणार आहोत. येत्या 19 डिसेंबर रोजी कुडाळ येथे जाहीर सभा घेणार आहोत, अशी माहिती केंद्रीय मंत्री राणे यांनी दिली.

या निवडणुकांत भाजपचा एकतर्फी विजय होणार आहे, असा दावा त्यांनी केला. सामाजिक, विधायक, शैक्षणिक कार्य नसलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन आमच्या विरोधात लढत आहेत. केवळ राजकीय टीका करून विनाकारण विरोध करण्याचा कार्यक्रम या तिन्ही पक्षाचा आहे. त्यामुळे सुज्ञ मतदार पुन्हा भाजपलाच विजयी करणार, राणे यांनी आज व्यक्त केला.

यावेळी मंत्री राणे म्हणाले, "मागील पाच वर्षात कुडाळ, वाभवे-वैभववाडी व जामसांडे-देवगड येथे भाजपची सत्ता होती. तेथे भाजपने विकासाची कामे केली आहेत. आरोग्य क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. कोरोना काळात रुग्णांना सेवा सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. याउलट राज्यात सत्तारूढ असलेल्या राजकीय पक्षांनी कोरोना काळात अपुऱ्या रुग्णसेवा दिल्या. जे रुग्ण कोरोना दगावले त्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या नगरपंचायत क्षेत्रातील 100 टक्के मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान करावे."

अफरातफर करणाऱ्यांच्या हातात बँक नको

राज्यात कुठेही भाजपने बॅँक किंवा साखर कारखाना बुडविल्याचे उदाहरण नाही. ते काम कोणत्या पक्षाने केले आहे, हे जगजाहीर आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत आमच्या विरोधी असलेल्या पॅनेलचे प्रमुख असलेल्या व्यक्तीने संचयनीमध्ये अफरातफर केली आहे. यासाठी जेलमध्ये गेले आहेत. याबाबत न्यायालयात केस पेंडिंग आहे. याबाबत आपण लवकरच वकील देणार आहोत. अशाप्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले विरोधी पॅनेलचे प्रमुख आहे, असा आरोप करतानाच केंद्रीय मंत्री राणे यांनी अशा व्यक्तींच्या हातात आपली बँक देणे योग्य नाही. जिल्ह्यातील बँक मतदार सुज्ञ आहेत. त्यांना मी याबाबत समजावून सांगणार आहे, असे सांगितले.

30 जानेवारीपर्यंत कोणते उद्योग येणार हे स्पष्ट

यावेळी बोलताना राणे यांनी आपल्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योग उभे करून रोजगार निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. 21 ते 23 जानेवारी कालावधीत आपल्या विभागाचे अधिकारी जिल्ह्यात येणार आहेत. यावेळी नेमके कोणते उद्योग सुरू करायचे, हे धोरण ठरणार आहे. 30 जानेवारी पर्यंत याबाबत निश्चिती होईल. याचा लाभ जिल्हावासीयांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. तसेच यामध्ये महिलांसाठी रोजगार मोठ्या प्रमाणात असतील, असेही ते म्हणाले.

जैतापूरबाबत नागरिकांची भूमिका बदलली

राज्यसभेत आज जैतापूर प्रकल्प होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत बोलताना केंद्रीयमंत्री राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात होऊ घातलेले दोन्ही प्रकल्प तेथील नागरिकांना हवे आहेत. त्यांची मते आता बदलली आहेत. तसे आपल्याला भेटून तेथील व्यक्तींनी सांगितले आहे. सव्वा लाख कोटींची गुंतवणूक जैतापूर येथे होणार आहे. त्यामुळे रोजगार निर्माण होणार आहे. परंतु प्रकल्पाबाबत नेमके काय आहे ? या खात्याच्या मंत्र्यांकडून माहिती घेऊन पुढील दौऱ्यात सांगितले.

तीन वर्षे होत आले तरी जिल्हाधिकाऱ्यांचे उत्तर नाही

मी ओरोस फाटा येथील शिवस्मारकाची दुरुस्ती करून ते ब्युटीफिकेशन करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवितो. आपण परवानगी द्यावी, असे पत्र मी माझ्या संस्थेच्यावतीने 31 डिसेंबर 2018 ला जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानंतर 29 मे 2021 रोजी स्मरणपत्र दिले. मात्र, त्याचे साधे उत्तर सुद्धा आपल्याला मिळालेले नाही. यावरून जिल्हाधिकारी असो किंवा आयुक्त कशाप्रकारे कारभार हाकत आहेत व मंत्र्यांचा त्यांच्यावर किती प्रभाव आहे, हे दिसून येत असल्याचे राणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT