Naresh Mhaske :'सत्तेसाठी मुस्लिमांचे लांगुलचालन करणारे उबाठा हिंदू धर्माच्या द्वेषामुळेच राममंदिरावर प्रश्न विचारत आहेत', अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. वक्फ बोर्डातील भ्रष्टाचाराबाबत उलेमा बचाव टोळीचे प्रमुख गप्प का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी यावेळी उपस्थित केला.
खासदार म्हस्के म्हणाले की, २०१९ मध्ये शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत असताना उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले. मतांसाठी मुस्लिम समाजाचे लांगुलचालन करणाऱ्यांना हिंदू देवदेवांबाबत आणि मंदिरांवर बोलण्याचा अधिकार नाही.
'वक्फ बोर्डाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरेंनी कधी प्रश्न विचारले नाहीत. वक्फ बोर्ड बरखास्त करा, अशी बाळासाहेबांची भूमिका होती, मात्र वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला उबाठाने विरोध केला. वक्फ बोर्डाने हिंदूंच्या, देवस्थानाच्या जमिनी, शेतकऱ्यांच्या जमिनी, संरक्षण खात्याच्या आणि सरकारच्या जमिनी लाटल्या, तेव्हा उबाठाने प्रश्न विचारले नाहीत. तेव्हा उबाठाचे हिंदुत्व कुठे गेले.', असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले, 'नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि ‘एनआरसी’बाबतही उबाठा कधी राष्ट्रहिताच्या बाजूने बोलले नाहीत. मुस्लिम समाजाच्या मतांसाठी उबाठाने कायम हिंदूविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे ते आता उलेमा बचाव टोळीचे प्रमुख झालेत'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणित एनडीए सरकारच्या काळात राम मंदिर उभं राहिलं. त्यामुळे उबाठाला पोटशूळ उठलाय. हिंदू धर्माबद्दलच्या आकसामुळेच उद्धव ठाकरे राममंदिर ट्रस्टवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यातून हिंदू धर्माची आणि हिंदू देवदेवतांवर ते टीका करत आहेत. उलेमा बचाव टोळीने वक्फ बोर्डाच्या गैरव्यवहारांवर बोलावे मगच राममंदिराचा विषय हाती घ्यावा, असे खासदार म्हस्के म्हणाले.
नीट पेपर फुटीबाबत अभिजित दिपके यांच्याकडून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला उबाठाने पाठिंबा दिला. त्यावर खासदार म्हस्के यांनी टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उबाठा मुख्यमंत्री असताना राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा, म्हाडा भरती आणि आरोग्य विभाग भरतीमध्ये पेपरफुटी झाली होती, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी राजीनामा दिला होता का? असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.