major revelation in Baba Siddique murder case Sarkarnama
मुंबई

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा! मुख्य सूत्रधार झीशान अख्तर नेपाळमध्ये?

Baba Siddique murder case latest update: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार झीशान अख्तर नेपाळमध्ये लपल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ISI कनेक्शनमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Mangesh Mahale

Baba Siddique murder mastermind: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणांच्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. या हत्येचा कथित मुख्य सूत्रधार झीशान अख्तर हा सध्या नेपाळमध्ये लपल्याचा संशय मुंबई क्राईम ब्रँचने व्यक्त केला आहे.

एवढेच नव्हे तर, त्याचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI शी संबंध असल्याची शक्यताही तपासली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता केवळ गँगवॉर नव्हे तर देशविरोधी कटाचा अँगलही जोडला जात आहे.

झीशान अख्तरचे शेवटचे लोकेशन नेपाळमध्ये ट्रेस करण्यात आले आहे. तपासादरम्यान त्याचे नाव पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टीसोबत जोडले गेले आहे. शहजाद भट्टी हा ISI साठी काम करत असल्याचा संशय पंजाब पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पाहण्यास सुरुवात केली आहे, असे मुंबई क्राईम ब्रँचच्या सूत्रांनी सांगितले.

झीशान अख्तरचा बिश्नोई गँगशी काहीही संबंध नसल्याचा दावा करणारी एक सोशल मीडिया पोस्ट अचानक व्हायरल झाली होती. या पोस्टमागे कोण आहे, याचा शोध मुंबई क्राईम ब्रँचकडून घेतला जात आहे. मात्र अद्याप पोस्टचा मूळ स्रोत शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबमधील भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ला प्रकरणात झीशान अख्तरचे नाव समोर आल्यानंतर बिश्नोई गँगने त्याच्यापासून हात झटकले असावेत, अशी शक्यता तपासली जात आहे.

विशेष म्हणजे, पंजाब पोलिसांनी झीशान अख्तर अझरबैजान किंवा एखाद्या युरोपीय देशात लपल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र मुंबई क्राईम ब्रँचचा दावा वेगळाच असून, तो सध्या नेपाळमध्येच असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंध दहशतवादी कारवायांशी?

फेब्रुवारी 2025 मध्ये झीशान अख्तरने एका अज्ञात ठिकाणाहून व्हिडिओ जारी करत बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आपल्याला खोटे अडकवण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील धक्कादायक धागेदोरे समोर येत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाचा संबंध दहशतवादी कारवायांशी आहे का, याचाही तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

बाबा सिद्दीकी यांची हत्या

बाबा सिद्दीकी यांची हत्या 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात गोळीबार करून करण्यात आली होती. ते आपल्या कार्यालयाबाहेर असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मुख्य सूत्रधार

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला होता. तपासात लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आले होते. त्यानंतर अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, झीशान अख्तर याला या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार मानले जात आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झीशान अख्तर मुख्य सूत्रधार असल्याचा संशय

  • झीशान अख्तर नेपाळमध्ये लपल्याचा मुंबई क्राईम ब्रँचचा दावा

  • ISI आणि गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंध असल्याची चौकशी

  • बिश्नोई गँगपासून अंतर ठेवल्याची शक्यता

  • व्हायरल सोशल मीडिया पोस्टचाही तपास सुरू

  • पंजाब पोलिसांचा दावा : अख्तर अझरबैजान किंवा युरोपमध्ये असू शकतो

  • दहशतवादी कारवायांच्या अँगलनेही तपास सुरू

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT