Sambhajiraje Chhatrapati, Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

NCP Vs Sambhajiraje : '' आपण पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेले छत्रपती, पण भविष्य कथन...?''; संभाजीराजेंना 'या' नेत्याचा चिमटा

Maharashtra Politics : '' अजितदादांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करण्यापेक्षा तुम्ही....''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहे. अशातच राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांचे वारे जोरदारपणे वाहू लागले होते. ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडूनही या चर्चांना हवा देण्यात आली.

आता माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत असे चॅलेंज देऊन सांगितले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाजीराजेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या विधानावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस(NCP)चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राकेश कामठे यांनी मंगळवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी संभाजीराजेंच्या वक्तव्यावर भाष्य केले. कामठे म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांनी मी चॅलेंज देऊन सांगतो की, अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊच शकत नाहीत, असे वक्तव्य केले होते.

संभाजीराजे आणि छत्रपतींच्या गादीविषयी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि वैयक्तिक आम्हाला सुद्धा कायम आदर आहे आणि राहील. पण तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यावयाची आहे,आज अजित पवार ज्या स्थानावर आहेत ते त्यांच्या स्व-कर्तृत्वाने आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेने प्रेम केल्यामुळे आहेत असे कामठे यांनी यावेळी सांगितले.

तसेच अजित पवार (Ajit Pawar)मुख्यमंत्री होतील का नाही, ते महाराष्ट्रातील जनता ठरवेल. पण आपण पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेले छत्रपती आहात. मग आपण ज्योतिषविद्या कधी शिकलात. आणि कधीपासून भविष्य कथन करायला लागलात. आणि ते भविष्य कथन करताना सुद्धा चुकीचे करत आहात. अर्थात नवीन नवीन शिकल्यामुळे चुका होत असतील. त्यात सुधारणा होईल ही अपेक्षा आहे. तसेच अजितदादांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काळजी करण्यापेक्षा तुम्ही मागच्या दाराने पुन्हा कसे खासदार होतात याच्याकडे जास्त लक्ष दिले तर बरे होईल असा टोलाही राकेश कामठे यांनी संभाजीराजेंना लगावला.

संभाजीराजे काय म्हणाले होते...?

स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje Chhatrapati) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाचा प्रथम वर्धापन दिन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला. यावेळी संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने भाजपाला लक्ष्य केले.तसेच अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतही विधान केले. ते म्हणाले, अनेक लोक म्हणतात की, एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार; पण मी चॅलेंज देऊन सांगतो की, अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत.

संभाजीराजे म्हणाले, ज्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करत होते, त्यांनाच आता सोबत घेतले आहे. राज्यातील जनतेची अशा युतीने मती गुंग झाली आहे; पण हे तीन पक्ष भविष्यात एकत्र राहणार नाहीत. हे पक्ष लोकसभेपुरते एकत्र आले आहेत. कदाचित लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार गट पुन्हा शरद पवार गटात सामील होईल, असे भाकीतही त्यांनी केले. या राजकीय परिस्थितीच्या विरोधात स्वराज्य पक्ष लढा देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT