Jitendra Awhad, Dhananjay Munde, Hasan Mushrif News Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो; आव्हाडांचे मुंडेंना सणसणीत प्रत्युत्तर

Jitendra Awhad ON Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत कलगीतुरा

Amol Jaybhaye

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यावर आव्हाड यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत मुंडेंना महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण करून दिली. बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो. हे कायम लक्षात ठेवा, असा इशाराच दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची रविवारी कोल्हापूरमध्ये सभा झाली. या सभेत धनंजय मुंडे म्हणाले होते, हसन मुश्रीफांनी तुम्हाला प्रेमाने जरी मिठी मारली, तर तुमच्या बरगड्या जागेवर राहतील का ? असा जोरदार टोला आव्हाडांना लगावला होता. त्यावर सोमवारी आव्हाड यांनी सणसणीत उत्तर दिले.

ट्विट करत आव्हाड म्हणाले, ''कालच्या सभेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असे भाष्य केले. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही की, बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो. हे कायम लक्षात ठेवा,'' असा जोरदार टोला लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांचे वस्त्रहरण सुरू आहे. शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेतून अजित पवार गटाच्या मंत्री आणि नेत्यांवर टीका केली जाते, तर त्याला अजित पवार गटाने उत्तरदायित्व सभेतून प्रत्युत्तर देणे सुरू केले. कोल्हापूरच्या स्वाभिमान सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हसन मुश्रीफ यांना साप म्हणत अशा सापांना तुडवण्यासाठी कोल्हापुरातील पायताणाचा वापर करावा लागेल, असे म्हटले होते.

त्यावर ज्यांना कोल्हापूरचे पायताण कसे आहे हे माहीत नाही, ते पायताणाची भाषा करतात. ज्यांनी पायताणाची भाषा केली, त्यांना मुश्रीफ साहेबांनी प्रेमाने जरी मिठी मारली तरी बरगड्या राहतील का ? अजितदादा तुम्ही महाराष्ट्रात लोकप्रिय होता,आता तुम्ही लोकनेतेदेखील आहात. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत खालच्या भाषेत जाऊन टीका करणार असाल, तर ते नागरिक कधीच सहन करणार नाहीत, असे मुंडे म्हणाले होते.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT