Nashik : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील इन्कमिंग -आऊटगोइंगलाही वेग आला आहे. विरोधी पक्षातील नेतेमंडळींनाच गळाला लावत मतदारसंघात आव्हान उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढत बंडखोरांना धडकी भरवली आहे. त्यातच आता नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला असून, शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. नाशिकमधून मनसेच्या तिकिटावर आमदारकी मिळवलेल्या नितीन भोसलेंनी आता शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे.
मनसे नेते नितीन भोसले यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत मुंबईत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह आदी नेतेमंडळी उपस्थित होते.
माजी आमदार नितीन भोसले (Nitin Bhosale) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पुन्हा एकदा शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. आता लवकरच नाशिकमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. या वेळी भोसले यांचे अन्य समर्थक प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याचदरम्यान आता नितीन भोसले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
...म्हणून मनसे सोडली ?
नाशिकमध्ये नितीन भोसले हे २००६ पासून मनसेत सक्रिय होते. त्यांनी तब्बल आठ वर्षे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. यानंतर त्यांनी २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यात पश्चिम नाशिक मतदारसंघातून भोसले हे निवडून आले होते. पण त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं. आता त्यांनी मनसेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
मनसेचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मध्यंतरी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र, नाशिक महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी भेट झाल्यानंतर वातावरण बदलले आणि भाजप उमेदवार सतीश कुलकर्णी यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नितीन भोसले यांनी नाराज होऊन तटस्थ राहणे पसंत केले होते. मध्यंतरी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अखेर त्यांनी शरद पवार गटाची वाट धरली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.