Kirit Somaiya Attack Case Sarkarnama
मुंबई

सोमय्या घसरून पडले की मॉब लिंचिंग? आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात झालेल्या कथित हल्ला प्रकरणावरून राजकारण तापू लागलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांच्यावर पुण्यात झालेल्या कथित हल्ला प्रकरणावरून राजकारण तापू लागलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र लिहित या प्रकरणाची NIA मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी सोमय्या यांचे मॉब लिंचिंग करून हत्या करण्याचे षडयंत्र होते, असा गंभीर आरोपही केला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भ्रष्टाचाराविरोधा तक्रार करणाऱ्या नेत्याची मॉब लिंचिंग करून हत्या करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यात पोलीसही सहभागी होते. केंद्र सरकारने यावर गंभीर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या या पत्रात केलेल्या आरोपांनंतर आता नबाव मलिक यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

मलिक म्हणाले, जे मॉब लिंचींग करतात तेच दुसऱ्यांवर मॉब लिंचीगचा आरोप करत आहे. सोमय्या यांच्या बॉडीगार्डने त्यांना ज्यापध्दतीने हाताळले, त्यातच ते पाय घसरून पडले, असं मलिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सोमय्या यांनी आपली हत्या करण्याचे हे षडयंत्र होतं, असा गंभीर आरोप केला आहे. पुणे महापालिकेत जाताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. त्यावेळी आपल्यावर हल्ला करण्यात आला, असं त्यांनी म्हटलं आहे.

पाटील यांनी काय म्हटलं आहे पत्रात?

पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, पुणे दौऱ्यात सोमय्यांना पोलिसांनी (Police) आवश्यक सुरक्षा पुरवली नाही. सोमय्या यांची मॉब लिंचिंगच्या माध्यमातून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी त्यांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले, सोमय्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करताना चुकीची कलमं का लावली, असे सवाल पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

सोमय्या हे महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारमधील नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकारकडून पोलिसांचा दुरूपयोग केला जात आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था संपल्याचे हे चिन्ह आहे. केंद्र सरकारने यावर गंभीर कारवाई करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

या घटनेची विस्तृतपणे आणि चोहोबाजूने चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी करत दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणी पाटील यांनी शहांकडे केली आहे. या षडयंत्रात सामील असलेल्या पोलिसांवरही कारवाई व्हावी. तसेच महाराष्ट्र सरकारची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि संविधान व कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करावे, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT