Mumbai: राज्यातील राजकारणात भाजपने राजकीय भूकंप घडून आणला आहे. मात्र,रविवारी (दि.२ जुलै) अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार केला असल्याची आरोप लावलेल्या मंत्र्यांनी देखील शपथ घेतली असल्याने पुन्हा एकदा सोमय्या यांची चांगलीच गोची झाली आहे. यापूर्वी देखील अनेकदा सोमय्या यांनी केलेल्या आरोपामधील नेत्यांची भाजप अथवा मित्र पक्षात प्रवेश झाल्यानंतर चौकशी थंड बसतात पडली होती.
किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आधी नेत्यांविरोधात सिंचन गैरव्यवहार, राज्य सहकारी बँक, साखर कारखान्यातील गैरव्यवहार गेली अनेक वर्षे जोरदार आघाडी उघडली होती. अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तीकर विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. सिंचन गैरव्यवहार प्रकरणी काही अधिकारी आणि अजित पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
ईडीने अजित पवार(Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांकडेही छापे टाकून चौकशी केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधातही सोमय्या यांनी मोहीम चालविली. मुश्रीफ यांच्याबरोबर चांगलीच जुंपली होती आणि सोमय्या यांना पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून मुंबईतच रोखले होते.
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे.
ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटी रुपयांचा आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर ईडीकडून तीनवेळा छापे टाकण्यात आले आहेत. मुश्रीफ यांच्या त्यांच्या तिन्ही मुलांमागेही ईडीचा ससेमिरा सुरु आहे. मुश्रीफांविरोधात कोल्हापूर आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या विरोधात 108 तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणांचा तपास कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे.
किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते आता भाजपबरोबर सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातील कायदेशीर कारवाई आता थंड बसतात पडण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना पूर्वीच्या शिवसेना मधील अनेक नेत्यांविरोधात देखील किरीट सोमय्या यांनी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. तसेच त्या नेत्यांविरोधात ईडीद्वारे चौकशी करण्यात यावी या संदर्भात तक्रार देखील केल्या होत्या.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेमधून बाहेर पडत 40 आमदारांचा गट तयार केला होता. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक, यामिनी जाधव व यशवंत जाधव आदींविरोधातही सोमय्या यांनी आघाडी उघडली होती. सरनाईक यांची अनधिकृत बांधकामे तर जाधव यांचे स्थायी समितीतील गैरव्यवहार यावर सोमय्या यांनी टीकेची झोड उठविली होती.
शिंदे गटातील हे नेते भाजप(BJP)बरोबर आल्यावर सोमय्यांची तोफ थंडावली तेच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबतही होणार आहे. भाजपबरोबर आल्यावर आनंदराव अडसूळ, प्रताप सरनाईक, जाधव व अन्य नेत्यांच्या विरोधातली सोमय्या यांची आरोपबाजी बंद झाली होती. आता अजित पवार, तटकरे, भुजबळ, मुश्रीफ यांच्याबाबत सोमय्या आवाज उठवणार का असा प्रश्न केला जात आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.