Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्या धार्जीण नाही?; राज ठाकरे, धनंजय मुंडे अन् आता अजित पवार

Sharad Pawar And Ajit Pawar : काका-पुतण्यातील संघर्षाने राज्याच्या राजकारणाला कलाटणी
Sharad Pawar, Ajit Pawar, Dhananjay Munde, Gopinath Munde
Sharad Pawar, Ajit Pawar, Dhananjay Munde, Gopinath MundeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Kaka-Putnya Politics : राज्यातील राजकारणात काका-पुतण्यांचे एकमेकांविरोधात संघर्ष महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. आज पुन्हा या संघर्षाची आठवण ताजी झाली. महाराष्ट्राला काका-पुतण्या वाद नवीन नाही. ठाकरे, पवार, मुंडे, तटकरे इत्यादी अनेक कुटुंबांमध्ये काका-पुतण्या वाद झाला आहे. यातील अनेक वादांची कारणं राजकीय असली, तरी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरलीत. आजपर्यंत काका-पुतण्याचे राजकीय वाद महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार रविवारी (ता. २ जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार यांनी सरकारमध्ये गेलेल्या कुणीही आपल्याशी चर्चा केली नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे राज्यात पवार यांच्या रुपाने पुन्हा एकदा काका-पुतण्याचा वाद समोर आला आहे. या पार्श्वभूमीर 'सरकारनामा'ने राज्यातील काही निवडक काका-पुतण्यांच्या संघर्षांचा आढावा घेतला आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar, Dhananjay Munde, Gopinath Munde
Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजितदादा; आता '33 टक्के एकदम ओके'

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते होते. १९६६ साली त्यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रभर पक्ष वाढवला. कालांतराने ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे हे राजकारणात आले आणि शिवसेनेत सक्रिय झाले. राज ठाकरे हे बाळासाहेबांचे बंधू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे सुपुत्र. बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले.

बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली. विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा मोठा वाटा होता. काकांसारखं व्यक्तिमत्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज हेच बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार मानले गेले. ३० जानेवारी २००३ हा दिवस राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या दिवशी महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यामुळे उद्धव हेच बाळ ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झाले.

Sharad Pawar, Ajit Pawar, Dhananjay Munde, Gopinath Munde
Balasaheb Thorat On Ajit Pawar : काँग्रेसच्या थोरातांची अजितदादांच्या शपथविधीवर तिखट प्रतिक्रिया; '' त्यांना सत्तेची चटक...''

हा राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का होता. २७ नोव्हेंबर २००५ रोजी राज यांनी शिवसेना सोडली. त्यापूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनीही सेना सोडलेली होतीच. मात्र राज यांच्या जाण्याने शिवसेनेतून पहिल्यांदा एक ठाकरे बाहेर पडले. महाराष्ट्रातील काका-पुतण्या वादाची मोठी घटना म्हणून याकडे पाहिले जाते. राज ठाकरे यांनी पुढे स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल सुरू केली. त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे

बीडमधील मुंडे काका-पुतण्या वादाने महाराष्ट्रात मोठी चर्चा घडवून आणली. आजही बीडमधील स्थानिक निवडणुका या गोष्टीच्या भोवताली होताना दिसतात. देशाचे माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. तेव्हा बीडमधला गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून त्यांचे धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जात होते.

मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचे राजकारण पाहत होते. २००९ साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. मात्र येथूनच मुंडे काका-पुतण्यातील सुप्त संघर्षाला सुरुवात झाली.

Sharad Pawar, Ajit Pawar, Dhananjay Munde, Gopinath Munde
Pankaja Munde News: पंकजा मुंडे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर...?

जानेवारी २०१२ मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसेच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला. या काका-पुतण्यांमध्ये एवढा वाद झाला की २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले.

मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजा यांनी बाजी मारली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असाच परळीतून सामाना रंगला. यावेळी काका-पुतण्या असा सुरू झालेल्या संघर्षाचे रुपांतर भाऊ-बहीण असे झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी बाजी मारली.

Sharad Pawar, Ajit Pawar, Dhananjay Munde, Gopinath Munde
NCP Crisis And Atul Benke : साहेब की दादा ? अतुल बेनकेंचे तळ्यात-मळ्यात; 'असा' घेणार निर्णय ?

शरद पवार आणि अजित पवार

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद दिसू लागले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीला ७१ आणि काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे यायला हवे होते. परंतु शरद पवार यांनी त्यावेळी काँग्रेसबरोबर बोलणी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिले. त्याबदल्यात दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद जास्तीचे घेतले.

तेव्हापासूनच अजितदादा पवार नाराज असल्याचे बोलले जात होते. २०१२ साली अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला होता. २०१९ मध्ये देखील अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेची शपथविधी केली होती. त्यावेळीही अजित पवार यांचा बंड शरद पवार यांनी मोडून काढला होता. पवार कुटुंबात कुठलेही फूट नसल्याचे सांगितले होते. यानंतर मात्र २०२३ मध्ये पुन्हा शरद पवार यांना अजित पवार यांनी मोठा झटका देत पक्षात बंड करून मोठ्या प्रमाणात आमदार फोडून युती सरकारमध्ये आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar, Dhananjay Munde, Gopinath Munde
Jayant Patil News: मंत्रीपदाची शपथ घेतलेल्यांना कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागणार; जयंत पाटलांचा थेट इशारा

सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरातही काका-पुतणे वाद झाला आहे. श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार अवधूत तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर या तटकरे काका-पुतण्या वादावर शिक्कामोर्तबच झाला होता.

सुनील तटकरे यांच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे राजकारणात आले. अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरेही राजकारणात आले. राष्ट्रवादीकडून ते श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदारही झाले. सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे विधान परिषदेत आणि मुलगी आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या.

अनिल तटकरे यांचे दुसरे पुत्र संदीप तटकरे यांनी २०१६ साली रोहा नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पर्यायाने सुनील तटकरे यांनाच आव्हान दिले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार असूनही अवधूत तटकरे यांनी लहान भावाचा म्हणजे शिवसेना उमेदावर संदीप तटकरेंच्या प्रचाराचा नारळ फोडला होता.

Sharad Pawar, Ajit Pawar, Dhananjay Munde, Gopinath Munde
Jayant Patil On Shivsena : 'त्या' शिवसेनेच्या आमदारांना आता पुन्हा माघारी फिरण्याची संधी; जयंत पाटलांचा मिश्किल टोला

जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर

बीडमधील राजकारण मुंडे घराण्याभोवती फिरतं तसेच ते क्षीरसागर घराण्याभोवतीही फिरतं. केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या. जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्यांची तीन मुले राजकारणात आहेत. आईसह तिघाही भावांची कारकीर्द आधी काँग्रेस आणि नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर तिघेही राष्ट्रवादीत दाखल झाले.

आपले वडील सर्व कामं करतात मात्र सत्तेचा वाटा मिळत नाही हे संदीप क्षीरसागर यांना वाटलं आणि तिथून मग संदीप यांनी आपलं वेगळं बस्तान बांधण्यास सुरुवात केली. या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहूनच अंतर्गत धुसफूस सुरू होती. आता जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर हे शिवसेनेत, तर रवींद्र क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीत आहेत. या कुटुंबात नंतर वाद झाले. २०१९ ला बीडला चुलता-पुतण्यात लढत झाली. पुतण्या संदीप राष्ट्रवादीकडून तर चुलते जयदत्त शिवसेनेकडून लढले. या लढतीत काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभव स्विकारावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com