Sunil Tatkare News Sarkarnama
मुंबई

Sunil Tatkare News : मराठा आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले...

Maratha Reservation News : " आघाडी सरकारमध्ये मी मंत्री असताना मराठा समाजाला..."

Deepak Kulkarni

राहुल क्षीरसागर

Thane News : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप,शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष,महाराष्ट्रात मिशन ४५ प्लस मोहीम राबविणार आहे.तीनही पक्षाचे राज्य व केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचा एकत्रित निर्णय घेणार असल्याची भूमिका राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे. तसेच त्यांनी मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर आरक्षण देण्यास आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे मोठे विधान तटकरे यांनी केले आहे.

राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,खासदार सुनील तटकरे(Sunil Tatkare) हे ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ठाण्यात आले होते. या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते आनंद परांजपे, ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष वीरू वाघमारे, परिवहन सदस्य मोहसीन शेख, नितीन पाटील उपस्थित होते.

सुनील तटकरे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. कायद्याच्या कक्षात, न्यायालयीन निर्णयाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये मी मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यात आले होते.

तसेच अल्पसंख्याक समाजालाही ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक बाबींवर हे आरक्षण काही टिकले नाही, नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राणे समितीने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाची सांख्यिकी माहिती जमा केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनेही तसेच उद्धव ठाकरेंच्या सरकारनेही आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचेही ते म्हणाले.

आजही जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला आमचा जाहीर पाठिंबा आहे.मराठा समाजाला यासाठी आंदोलन करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे,इतरही समाजाची आरक्षणाची मागणी आहे. त्याचेही आम्ही समर्थन करतो.पण आरक्षण कायद्याच्या व न्यायालयाच्या आधारावर टिकावे, हीच आमची स्पष्ट भूमिका आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

तीनही पक्ष एकत्रित लढणार...

तटकरे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील तीनही पक्ष एकत्रित लढणार आहेत. महाराष्ट्रात मिशन ४५ प्लस ही मोहीम आम्ही राबविणार आहोत. योग्यवेळी तीनही पक्षातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय टीम,राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वतः केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल तसेच दोन्ही पक्षातील केंद्रस्तरीय नेते हे एकत्रित बसून महाराष्ट्रातील लोकसभा जागेबाबत निर्णय घेतील व तो आम्हा तीनही पक्षांना मान्य असेल.

दिवाळीपूर्वी मी महाराष्ट्र दौरा करणार आहे. तर दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातुन महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहोत अशी माहिती तटकरे यांनी दिली. भाजप,शिवसेना यांच्याबरोबर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या विकासाच्या तळमळीतून सत्तेत सहभागी झाला आहे. पण सत्तेत सहभागी होताना फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा आम्ही अजिबात सोडलेली नाही किंवा धर्मनिरपेक्षताही सोडलेली नाही.

सत्तेत आल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वसामान्यांची कास धरणारे घेतलेले गतिमान निर्णय याची साक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मान्यतेचा दावा निवडणूक आयोगाकडे दाखल झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा घटनात्मक दर्जा मान्य केला आहे. निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. त्याचा सर्वांनी सन्मान करायला हवा, असेही सुनील तटकरे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT