Supriya Sule On Badlapur Case Sarkarnama
मुंबई

Badlapur Rape Case : "पीडित मुलींचे पालक 12 ते 18 तास वणवण फिरत होते..." बदलापूर प्रकरणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

Jagdish Patil

Badlapur Rape Case : बदलापूर (Badlapur) येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पालक आक्रमक झाले आहेत. यासाठी मंगळवारी (ता. 20 ऑगस्ट) सकाळपासून नागरिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी तीन तासांपासून रेल्वे थांबवल्या आहेत. तर नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली आहे.

एकीकडे संतप्त झालेल्या पालकांनी आरोपीवर कठोर कारवाई करत नाहीत असं सांगत पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे आता विरोधीपक्षातील नेत्यांनी नागरिकांना रस्त्यावर यावं लागणं हे सरकारचं अपयश असल्याचं म्हटलं आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सुळे यांनी सरकारने राजीनामा दिला पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे. बदलापूर घटनेवर बोलताना सुळे म्हणाल्या, "तुम्ही महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देत आहात. त्याचं मनापासून स्वागत करतो. पण पैसे देऊन प्रश्न सुटत नाही. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील सरकारचीच आहे ना? या घटनेचा उच्च स्तरावर तपास झाला पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.

तसंच, "लोकांचा रोष आहे. ते रस्त्यावर येऊन दगड का फेकत आहेत? त्यांना पोलिसांकडून न्याय मिळत नाही? माझ्या कानावर आलं आणि माध्यमांकडून देखील सांगण्यात येत आहे की, पीडित मुलींचे पालक बारा ते अठरा तास न्याय मागत वणवण फिरत होते. पण तरीही एकाही पोलिस स्टेशनने त्यांची दखल घेतली नाही. हा न्याय आहे का? महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र असून यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात लेकीला न्याय मिळत नसेल तर सरकारने राजीनामा दिला पाहिजे." असंही सुळे म्हणाल्या.

शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाते प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही शाळा भाजपशी संबंधित असल्याची माहिती समजल्याचं म्हटलं आहे. ठाकरे म्हणाले, "बदलापूरमधील शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित होती, अशी माहिती मिळत आहे. मला राजकारण करायचं नाही.

अन्य कुणीही राजकारण करू नये. यात कोणत्याही पक्षाचा अर्थात भाजपचा जरी असला, तरी विनाविलंब कारवाई झाली पाहिजे. वरळीत मिहीर शहाने महिलेला फरपटत नेलं. या प्रकरणाचं पुढे काय झालं? की त्याच्याकडून निबंध लिहून घेतला? बदलापुरातील प्रकरणात भाजप कार्यकर्ते असतील, तर त्यांच्याकडून निबंध लिहून घेऊन सोडून देणार आहात का?"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT