Sandipan Bhumare, Jayant Patil, Sudhir Mungantiwar
Sandipan Bhumare, Jayant Patil, Sudhir Mungantiwar Sarkarnama
मुंबई

NCP vs Shivsena and BJP : जयंत पाटलांच्या दाव्यातील भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी हवाच काढली; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसागणिक अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनाही उधाण आले आहे. मुख्यमंत्रीपदावर रोज नवीन दावेदारी पाहायला मिळत आहेत. त्यातच राष्ट्रवादी, काँग्रेसमधील नेतेमंडळींच्या मुख्यमंत्रीपदावरील विधानांमुळे आघाडीतील मतभेद लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल असा दावा केला आहे. त्यावर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

जंयत पाटील म्हणाले, "महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी(NCP)चा होणार, हे आता सगळ्यांनी मान्य केलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येत आहे. जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमतानं चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही." जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे आमदार, मंत्री संदिपान भुमरे व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील सतत म्हणत असतात की आता राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार. मात्र त्यांनी हे लक्षात घ्याव की सध्या राज्यात युतीतील पक्ष सर्वात मोठे आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये युती हा सगळ्यात मोठा पक्ष ठरणार आहेत. त्यामुळे युतीचीच सत्ता स्थापन होईल. त्यानंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही."

भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivwar) यांनीही राष्ट्रवादी पक्षाच्या नशिबात मुख्यमंत्री पदाचा योग नसल्याची टीका केली आहे. मुनगंटीवार म्हणाले, "स्वतःच्या पक्षाचा कौतुक करण्याचा सर्वांना अधिकार आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, असेही ते म्हणू शकतात. जयंत पाटलांना हे माहीत आहे की १९९९ पासून राष्ट्रावादी पक्षाने वारंवार सांगितले आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. आता राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देईन. मात्र स्थापनेपासून त्यांच्या नशिबात तसा योग आलेला नाही. हा योग जनता ठरवत असते, नेते नाही."

काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनीही आपली भू्मिका स्पष्ट करून महाविकास आघाडीतील या वादग्रस्त मुद्द्याला बगल दिली आहे. पटोले म्हणाले, "ज्या पक्षांचे जास्त आमदार असतात त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे आता काँग्रेसला यावर जास्त चर्चा करायची नाही."

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar), भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे एकीकडे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असताना काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT