Mumbai, 24 March : सातारा जिल्हा परिषद प्रकरणावरून पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश देणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, त्यावरून महाआघाडीत फूट पडली असून अविश्वास प्रस्तावासाठी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र दिले आहे. त्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांच्या सह्या नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीतही सर्वकाही आलेबेल नसल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी पोलिसांकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यात देसाई यांच्या हाताला जखम झाली होती. विधान परिषदेत देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी पोलिसांची दादागिरीबाबत कथन केल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सभापतींच्या खुर्चीवरून पोलिस अधीक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, आमदार प्रवीण दरेकर यांनी उपसभातिपदाच्या अधिकाराबाबत भाष्य केले होते.
भाजपने गोऱ्हेंच्या अधिकाराबाबत बोलताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) माजी मंत्री अनिल परब यांनी उपसभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची परवानगी सभापती राम शिंदे यांच्याकडे मागितली होती. भाजपचे मंत्री आणि आमदारांनी गोऱ्हेंच्या विरोधात नाराजीचा सूर लावताच ठाकरेंच्या शिवसेनेनेही मोठा डाव टाकत शिंदे यांच्याकडे अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.
गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सभापती शिंदे यांच्याकडे पत्र दिले आहे. त्या पत्रावर केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्याच सह्या आहेत. त्यावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांच्या सह्या नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे मानले जात आहे.
माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यासह ठाकरे सेनेच्या सहा, तर काँग्रेस पक्षाच्या चार आमदारांच्या सह्या आहेत. पण पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सही केली नसल्याचे सांगितले जात आहे. इतर दोन आमदार अनुपस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्याही सह्या या पत्रावर नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीत सुसंवाद नसल्याचे दिसून येते.
अविश्वास ठरावावर दहा सह्यांची गरज होती, त्यामुळे उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, ज. मो. अभ्यंकर, अनिल परब, सचिन अहीर, सुनील शिंदे यांच्या सह्या आहेत. तर काँग्रेसचे भाई जगताप, धीरज लिंगाडे, राजेश राठोड आणि सुधाकर आडबले या चौघांच्या सह्या आहेत.
सातारा जिल्हा परिषदेत शशिकांत शिंदे यांची शिंदेसेनेसोबत युती आहे, त्यामुळे त्यांनी त्या पत्रावर सही केलेली नाही. त्यांना सही करण्याबाबत विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी आपली अडचण असल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांची सही होऊ शकली नाही. एकनाथ खडसे आणि अरुण लाड हे राष्ट्रवादीचे सदस्य अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या सह्या नाहीत.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेलाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनुपस्थित होते, त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.