Ramesh Bais Sarkarnama
मुंबई

Ramesh Bais : नवनियुक्त राज्यपाल रमेश बैंस शनिवारी घेणार शपथ

Maharashtra : महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून लाभले विविधांगी कार्यानुभव असलेले व्यक्तिमत्त्व

सरकारनामा ब्युरो

Maharashtra New Governor : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैंस (Ramesh Bais) पदाची सूत्रे स्वीकारणार आहे. त्यांचा शपथविधी समारंभ दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे. तत्पूर्वी बैंस यांचे शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर स्वागत करतील.

रमेश बैंस यांचा परिचय

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैंस (Ramesh Bais) पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे. त्यांना संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव आहे. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत.

रायपूर येथे जन्म

रमेश बैंस (Ramesh Bais) यांचा जन्म रायपूर (छत्तीसगड) येथे दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. त्यांचे यांचे शिक्षण रायपूर येथे झाले. सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते.

याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्रीही होते.

सातवेळा लोकसभेवर

  • सन १९८९ साली बैंस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. सन १९९८ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैंस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

  • सन १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले. सन २००३ साली बैंस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला. त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

  • आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

दुर्लक्षीत घटकांच्या हक्काबाबत संशोधन

सन २००९ ते २०१४ या काळात बैस हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. बैंस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

त्रिपुरा, झारखंडचे राज्यपाल

सन २०१९ साली बैंस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दि. २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.

समाजसेवेची आवड

नवनियुक्त राज्यपाल बैंस यांना समाजसेवेची आवड आहे. त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT