Nitin Gadkari: देशभरात एक्स्प्रेस वेचं जाळं निर्माण करणारे केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या एका विधानाची सध्या चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र सरकारनं बनवलेल्या बहुचर्चित मिसिंग लिंकच्या मध्यंतरी झालेल्या दुरावस्थेवर त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं फडणवीस सरकारला त्यांनी घरचा आहेर दिल्याचं बोललं जात आहे.
मुंबईत एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी म्हटलं की, "आपण बऱ्याच नवीन तंत्रज्ञानाचा रस्ते विकासात वापर करत आहोत. यामध्ये तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा आपला कणा आहे. तसंच क्विलिटी मॉनिटरिंग चांगलं व्हायला पाहिजे, मी आता २७ वर्षे हेच काम करतो आहे. मी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे बनवला, त्यावर एकही खड्डा नाही. तुम्ही जाता ना त्या रस्त्यावरुन? अजूनही रस्ता चांगला आहे. पण त्याची कधी बातमी छापली जात नाही. पण दुसरा राज्यसरकारचा कुठलाही रस्ता असला आणि त्यावर खड्डे असले तर त्याचा संबंध लोक माझ्याशीच जोडतात.
आता आपल्याकडं 'मिसिंग लिंक' बघा, माझ्यावेळी वन खात्यानं हा रस्ता बनवायला परवानगी दिली नव्हती. त्यामुळं मी हा रस्ता बनवू शकलो नव्हतो. पण आता महाराष्ट्र सरकारनं मिसिंग लिंक बनवला आणि तो खराब झाला. पण तरीही सोशल मीडियावर मला टार्गेट केलं जात होतं, हे बघा रस्ता इथं दरड कशी कोसळली. त्यामुळं आता सोशल मीडियाचा एक फायदा झाला आहे, तो म्हणजे क्वालिटी कन्ट्रोलसाठी तो खूपच उपयोगी बनला आहे. आता पटापट लक्षात येतं कुठे गडबड झाली आहे?"
दरम्यान, मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' हा रस्ता खोपोली एक्झिट ते कुसगाव (लोणावळा) या मार्गावर १३.३ किमी लांबीचा नवीन मार्ग आहे. १ मे २०२६ रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं. यामुळं दोन्ही एक्झिट पॉईंटमधील अंतर सुमारे ६ किमीनं कमी झालं असून प्रवासातील अर्धा तासाची बचत होत आहे. पूर्वी जुन्या १९ किमी घाटाच्या अंतरापैकी जवळपास ६ किमी अंतर कमी झालं आहे. या मार्गावर ६५० मीटरचा पूल हा केबर-स्ट़ेड तंत्रज्ञानानं बनवलेला आहे. या मिसिंग लिंकसाठी तब्बल ७००० कोटी रुपये खर्च आला आहे. पूर्वीच्या तीव्र वळणाच्या रस्त्यांची कटकट यामुळं मिटली आहे.
पण या रस्त्यावरील दोन क्रमांकाच्या बोगद्याच्या तोंडाजवळ ६ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळं दरड कोसळली आणि हा मार्गच बंद झाला होता. त्यामुळं १८ तास हा मार्ग बंद ठेवून यावरची वाहतूक जुन्या मार्गावरुन वळवण्यात आली होती. तसंच या बोगद्यातून आतमध्ये शिरताना रस्त्यावर खड्डे देखील आढळून आले होते. दरम्यान, हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं (MSRDC) हा रस्ता तयार केला असून दरड कोसळल्याच्या घटनेला नैसर्गिक आपत्तीचा भाग असल्याचं म्हटलं होतं. म्हणजेच त्याच्या बांधकामात काहीही चूक नसून या घटनेमुळं या मार्गाचं स्ट्रक्चरल नुकसान झालेलं नाही, असंही महामंडळानं म्हटलं होतं.
पण आता नितीन गडकरी यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि आता फडणवीस सरकारच्या काळात तयार झालेल्या मिसिंग लिंकच्या कामावर बोट ठेवल्यानं हा रस्ता आणि सरकारचा दावा दोन्ही चर्चेत आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.