Nana patole
Nana patole Sarkarnama
मुंबई

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये वाद : नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (By-election) शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेस (Congress) पक्षात मतभेद असल्याचे समोर आले आहे. मात्र, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी त्यावर भाष्य केले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून पक्षात कोणीही नाराज नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. (No controversy in Congress over supporting Shiv Sena : Nana Patole)

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झली आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार ता. ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून ता. ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपकडून हा मतदारसंघ लढवला जात आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम तर त्यानंतर काँग्रेस पक्षाकडूनही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस पक्षातील धूसफूस पुढे आली आहे. पोटनिवडणुकीत शिवसेनेला काँग्रेसकडून मदत करण्यात येणार असेल तर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना काँग्रेस पक्षाला मदत करणार का, असा प्रश्न काँग्रेसमधील काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शिवसेना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे पुढे आले आहे. मात्र, नाना पटोले यांनी मतभेदाचा मुद्दा फेटाळून लावला आहे.

खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा मार्ग निश्चित करण्यासाठी तसेच केरळ, तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने जनआंदोलन झालं, तसं महाराष्ट्रातही व्हावं, यासाठी काम सुरू आहे, असेही पटोले यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

शिंदे-फडणवीस सरकारला आज १०० दिवस पूर्ण होत आहेत. पण, या शंभर दिवसांमध्ये राज्याला भोपळा मिळालेला आहे. राज्याची बदनामी मोठ्या प्रमाणात झाली आहे. प्रशासन ठप्प झालं आहे. सरकारमधील लोकं तुपाशी आहेत; मात्र जनता उपाशी आहे. महाराष्ट्राचं नुकसान करण्याचं काम ईडी सरकारने केलेलं आहे, असा आरोपही पटोले यांनी केला आहे.

दसरा मेळाव्यासाठी एसटी बस बुक करण्यात आल्या होत्या. मात्र, एसटी बस बुक करण्यासाठी शिंदे गटाने १० कोटी रुपये भरले आहे, ते १० कोटी कोठून आणले, असा सवालही पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT