Rajendra Gavit, Prakash Nikam  Sarkarnama
मुंबई

Palghar Lok Sabha: गावितांचा भाजप प्रवेश अन् निकमांचे वादग्रस्त वक्तव्य; ऐन निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली

Rajendra Gavit News: शिवसेनेच्या राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. त्याच गावितांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

भगवान खैरनार

Palghar Lok Sabha Constituency: ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पालघर लोकसभेच्या निवडणुकीत महायुती चांगलीच अडचणीत आली आहे. शिवसेनेच्या राजेंद्र गावितांच्या (Rajendra Gavit) उमेदवारीला ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. त्याच गावितांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. हे कमी की काय म्हणून तिकडे शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम (Prakash Nikam) यांनी वाढवण बंदर आंदोलकांना दलाल म्हणून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

निकमांच्या (Prakash Nikam) या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीविषयी किनारपट्टी भागात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप आणि महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे. महायुतीने देशात 400 पार आणि राज्यात 45 पार चे लक्ष ठेवले आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात महायुतीने सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपने (BJP) शिवसेनेकडून हिसकावून घेतला आहे. तर भाजपने या मतदारसंघात डॉ. हेमंत सवरा (Dr. Hemant Sawra) यांना उमेदवारी देत बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीसमोर (MVA) तगडे आव्हान ऊभे केले आहे. त्यामुळे पालघरची लढत तिरंगी बनली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्या ऊपस्थितीत शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्या गावीतांच्या ऊमेदवारीला स्थानिक भाजपच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला, होता त्यांनाच पक्षात सन्मानाने प्रवेश दिल्यामुळे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहे. मात्र, या नाराजीबाबत कोणीही उघड प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

गावीतांच्या पक्ष प्रवेशामुळे कार्यकर्ते नाराज असतानाच दुसरीकडे सवरांच्या प्रचार सभेत बोलताना पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवण बंदर आंदोलकांचे मने दुखावणारे वक्तव्य केले आहे. प्रस्तावित वाढवण बंदराच्या विरोधासाठी, वाढवण बंदर विरोधी संघर्ष कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. गेली कित्येक वर्षे ही समिती लढा देत आहे. तर सभेत बोलताना निकम यांनी या समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना दलाल म्हणून संबोधलें त्यामुळे पालघरच्या सागरीपट्ट्यात निकम यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

निकमांच्या बेताल वक्तव्याने बंदरपट्टी भागातील शेतकरी, आदिवासी, मच्छिमार आणि बागाईतदार संतप्त झाले आहेत. त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. बंदर विरोधी संघर्ष कृती समितीने महायुतीला मतदान न करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात महायुती अडचणीत सापडली आहे.

महायुतीला मतदान न करण्याचे आवाहन

गेली 25 वर्षापासून कोणत्याही पक्षाचा आधार न घेता, आमची वाढवण बंदर विरोधी संघर्ष कृती समिती, बंदर ऊभारणीला विरोध करत आहेत. निकम हे आमच्याच बंदरपट्टी भागातुन, आमच्याच मतांवर निवडुन आले आहेत आणि असे बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे. तसेच कोणावरही दबाव न टाकता महायुतीला मतदान न करण्याचे आवाहन मतदारांना केले असल्याची माहिती नारायण पाटील, अध्यक्ष, वाढवण बंदर विरोधी संघर्ष कृती समिती यांनी सांगितली.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT