Pune News : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar Murder Case) यांच्या हत्या प्रकरणाचे गुढ 11 वर्षानंतरही कायम राहिले आहे. दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पण या हत्येमागचा सुत्रधार कोण, असा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. या हत्या प्रकरणाच्या तपासापासून, अटक करण्यात आलेले आरोपी, जप्त करण्यात आलेले पिस्तूल, साक्षीदारांची उलटतपासणी अशा अनेक बाबतीत अजूनही गुढ कायम आहे. हत्येसाठी वापरलेले पिस्तूल शोधण्यासाठी सीबीआयने तब्बल साडे सात कोटी रुपये खर्च केले होते. पण त्यावरूनही बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या होत्या.
दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर, सचिन अंदुरे (Sachin Andure) आणि शरद कळसकर (Sharad Kalaskar) यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणात पिस्तूल विक्रेता मनिष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांची पहिली अटक केली होती. पण या दोन्ही आरोपींचा या प्रकरणासोबत काहीही संबंध नसल्यानं कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली. त्यानंतर मुंबई हायकोर्टानं जून 2014 मध्ये हा तपास सीबीआयकडे (CBI) दिला. (Latest Marathi News)
सीबीआयच्या तपासात कळसकरने पुनाळेकरांच्या सल्ल्याने 2018 मध्ये चार पिस्तूल ठाणे येथील अरबी समुद्राच्या खाडीत फेकून दिल्याचे समोर आले होते. हे पिस्तूल शोधण्यासाठी सीबीआयने तब्बल साडे सात कोटी रुपये खर्च केले. त्यासाठी दुबई येथील एनव्हिटेक मरीन कंसल्टंट्सची नियुक्ती केली होती. कंपनीने पिस्तूल शोधण्यासाठी नॉर्वे येथील अत्याधुनिक यंत्र मागवली. ही यंत्र भारतात आणण्यासाठी 95 लाखांचे सीमा शुल्कही माफ करण्यात आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून अरबी समुद्राच्या तळातून पिस्तूल शोधून काढण्यात आले. ही कसरत करण्यासाठी सीबीआयने साडेसात कोटी रुपये खर्च झाले. सीमा शुल्क माफ झाल्याने सुमारे एक कोटींनी कमी झाला. हा खर्च सीबीआय, महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी उचलल्याची चर्चा होती. दाभोलकर, गौरी लंकेश आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास या यंत्रणांकडून सुरू होता. या तिघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर केल्याचा संशय सीबीआयला होता.
सीबीआयला समुद्रात सापडलेल्या पिस्तुलाचाच वापर हत्येसाठी करण्यात आला होता की नाही, यासाठी ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले होते. त्याच्या अहवालाचे गुढही कायम आहे. हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल नाही, असे अहवालात नमूद करण्यात आल्याच्या बातम्या तीन वर्षांपुर्वी प्रसिध्द झाल्या होत्या. पिस्तूलचा शोध लागल्यानंतर सहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.