Hitendra Thakur Sarkarnama
मुंबई

Hitendra Thakur News : 'कार्यालयात येऊन फटकावेन’ आमदाराची मुजोरी ; महापालिका अधिकाऱ्यांना दमदाटी; तुमच्या कानाखाली वाजवली पाहिजे..

Vasai Virar Municipal Corporation : "शहाणपणा करू नकोस. मला पोपटाकडून उत्तरे नको आहेत..

सरकारनामा ब्यूरो

Virar : ‘शहरातील समस्या सोडविल्या नाहीत, तर कार्यालयात येऊन फटकावेन’ अशी भाषा वापरणाऱ्या आमदार हितेंद्र ठाकूर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महापालिका अधिकाऱ्यांना दमदाटी करणारे हितेंद्र ठाकूर यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ठाकूर यांच्या दमदाटीनंतर कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिलेली नाही.

काल (मंगळवारी) देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात होता. विरार महापालिकेच्या हद्दीतही स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने विरारमध्ये जनता दरबार भरवण्यात आला होता. जनता दरबारात पाणी प्रश्नांवरून आमदार हितेंद्र ठाकूर हे पालिका अधिकारी व आयुक्तांवर भडकले.

पाणीपुरवठा, फेरीवाले, कचरा समस्यांवर नागरिकांनी हितेंद्र ठाकूर यांच्यापुढे तक्रारी मांडल्या. "तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी शहराचा सत्यानाश केला आहे. स्वत:ला काय राजे समजता का, आयुक्त तुम्हाला पालिकेत येऊन फटकावेन," अशा भाषेत त्यांनी आयुक्तांना धारेवर धरले. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे इतर अधिकाऱ्यांनी न देता आयुक्तांनी द्यावीत, असा आग्रह ठाकूर यांनी धरला. त्यांनी शिव्या देत आपला संताप व्यक्त केला.

महापालिका उपायुक्त चारूशिला पंडित कचऱ्याच्या प्रश्नावर उत्तर देत असताना त्यांच्यावर आमदार ठाकूर संतापले. "शहाणपणा करू नकोस. मला पोपटाकडून उत्तरे नको आहेत, कमिशनरकडून उत्तर हवे," असे ठाकूर म्हणाले.

नागरिकांनी वाहतूक कोंडीवर विचारलेल्या प्रश्नावर अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे स्पष्टीकरण देत असताना "कसले सर्वेक्षण करतो ? तुमचे सर्वेक्षण चुलीत घाला, तुम्ही डोक्यावर नाचायला लागला आहात. तुमच्या कानाखाली वाजवली पाहिजे," असा दम आमदार ठाकूर यांनी मनाळे यांना दिला.

वसई-विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते मुख्यालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अजिंक्य बगाडे यांच्यासह आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील हे उपस्थित होते.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT