Param Bir Singh  Sarkarnama
मुंबई

परमबीरसिंह प्रकरणात मोठी घडामोड : फरार विनयसिंह अखेर सापडला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह हे अडचणीत आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) हे अडचणीत आले आहेत. त्यांच्यासोबत एका खंडणी प्रकरणात आरोपी असलेला विनयसिंह (Vinay Singh) फरार होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेला यश आले आहे.

गोरेगावमध्ये दाखल खंडणीच्या गुन्ह्यात परमबीरसिंह यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. व्यावसायिक बिमल अगरवाल यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. परमबीरसिंह आणि इतर पाच आरोपींनी अगरवाल यांच्या दोन बारवर छापा न टाकण्यासाठी 9 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात विनयसिंह हा आरोपी असून, तो फरार होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. नंतर तो सर्वोच्च न्यायालयात गेला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याला पोलिसांसमोर शरण जाण्यास बजावले होते. तो आज एका कॅफेमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तो शरण येण्याआधीच त्याच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणात परमबीरसिंह यांच्यासोबत सचिन वाझे आणि आणखी चार आरोपी आहेत. त्यातील सुमितसिंह ऊर्फ चिंटू आणि अल्पेश पटेल यांना अटक करण्यात आली आहे. रियाज भाटी आणि विनयसिंह ऊर्फ बबलू हे फरार होते. याच प्रकरणात परमबीरसिंह यांना फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. सिंह यांच्या विरोधात आणखी चार प्रकरणात आरोपपत्र दाखल व्हायचे आहे. त्यांच्या विरोधातील पहिले आरोपपत्र गोरेगाव प्रकरणात दाखल झाले आहे.

परमबीरसिंह हे 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती. नंतर दुसऱ्या दिवशी ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांची चौकशी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांची गोरेगावमधील खंडणी प्रकरणात चौकशी करुन जबाब नोंदवला होता. या प्रकरणी परमबीरसिंहांच्या विरोधात पहिले आरोपपत्र दाखल झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT