Mumbai News, 25 Sep : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी हजारो कोटी रूपयांच्या पायाभूत प्रकल्पांची भूमिपूजने केली. त्यानंतर इटानगर येथील सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
मोठी विकास कामे करण्याचे धाडस काँग्रेसने कधीच दाखवले नाही. ही त्यांची जुनीच सवय आहे. त्यामुळेच ईशान्य भारताचे नुकसान झाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मोदी यांचे खरेच या भागाकडे लक्ष असते तर मणिपूरसारखे राज्य तीन वर्षे सलग वांशिक वणव्यात होरपळले नसते, पंतप्रधान मोदी म्हणजे एक अगम्य व्यक्तिमत्त्व आहे. गुंते स्वतःच निर्माण करायचे व त्या गुंत्यातून आपले पाय मोकळे करून काँग्रेसवर खापर फोडायचे हेच उद्योग त्यांनी 11 वर्षांत केले, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
सामनात लिहिलं की, 'पंतप्रधान मोदी म्हणजे एक अगम्य व्यक्तिमत्त्व आहे. गुंते स्वतःच निर्माण करायचे व त्या गुंत्यातून आपले पाय मोकळे करून काँग्रेसवर खापर फोडायचे हेच उद्योग त्यांनी 11 वर्षांत केले. इतका अपयशी पंतप्रधान जगाच्या पाठीवर दुसरा झाला नसेल, पण लोकांना धर्म-जातीची अफू पाजून धुंद केल्याने छंदी-धुंदी लोक याही स्थितीत पंतप्रधान मोदींचे भजन करतात.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय एकात्मता राखण्यात, किंबहुना आजचा भारत घडविण्यात काँग्रेसचे योगदान आहे. या सगळ्याची भयंकर पोटदुखी असल्याने पंतप्रधान मोदी यांना रोजच काँग्रेस द्वेषाची उबळ येत असते. मोदी पहलगामवर बोलत नाहीत, प्रे. ट्रम्प यांच्या दमबाजीवर गप्प बसतात, ‘ऑपरेशन सिंदूर’ कोणाच्या दबावामुळे मागे घेतले?
या प्रश्नाला उत्तर देत नाहीत, पण ‘काँग्रेस एके काँग्रेस’ हे ते बोटे कडाकडा मोडत बोलतात. एकंदरीत काय तर मोदी हे काँग्रेसमय झालेले दिसतात', असा टोला सामनातून लगावला आहे. तर देशात आतापर्यंत जे जे वाईट घडले ते फक्त आणि फक्त काँग्रेसमुळेच, असा मोदींचा एककलमी कार्यक्रम सुरू असतो. अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना मोदींनी मोठी विकास कामे करण्याचे धाडस काँग्रेसने कधीच दाखवले नाही.
ही त्यांची जुनीच सवय आहे. त्यामुळेच ईशान्य भारताचे नुकसान झाल्याचं म्हटलं. शिवाय भाजपने हा दृष्टिकोन बदलल्यानेच आता तिथे सकारात्मक बदल झाला अशी स्वतःची टिमकीही त्यांनी वाजवून घेतली. मात्र, ईशान्येकडील राज्यांच्या विकासाकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले आणि मोदी सरकारने लक्ष दिलं म्हणणं हा विनोदच म्हणावा लागेल.
मोदी यांचे खरेच या भागाकडे लक्ष असते तर मणिपूरसारखे राज्य दोन-तीन वर्षे सलग वांशिक वणव्यात होरपळले नसते. मोदी सरकारने वेळीच लक्ष घातले असते तर हा हिंसेचा वणवा भडकला नसता. मोदी तेथील रक्तरंजित हिंसाचाराकडे फक्त बघत राहिले. हिंसाचार कमी करण्याचा प्रयत्न सोडा, तो कमी व्हावा अशी मोदी सरकारची मानसिकताही गेल्या तीन वर्षांत जाणवली नाही.
3 वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर तुम्ही 13 सप्टेंबरला एक दिवसाची भेट मणिपूरला दिली. मात्र तुमची पाठ फिरताच तेथे पुन्हा हिंसेचा उद्रेक झाला. काँग्रेसच्या काळात ईशान्येतील एकही राज्य एवढ्या भयंकर जातीय वणव्यात होरपळले नव्हते. तेव्हा काँग्रेसला जाब विचारण्यापेक्षा मणिपूर तीन वर्षे का जळत होते? अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीन गावे का बसवू शकला?
तेथील अनेक गावांची नावे त्या देशाने परस्पर बदलली, तुम्ही गप्प का बसलात? लडाख-गलवानपासून अरुणाचलपर्यंत चीनने तुमच्या नाकाखालून घुसखोरी केली नाही का? त्रिपुरापासून आसामपर्यंत सर्व राज्ये आजही अशांत का आहेत? या प्रश्नांची उत्तरे आधी देशातील जनतेला द्या. काँग्रेसला काय जाब विचारता? असा हल्लाबोल सामनातून मोदी सरकारवर करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.