Hasan Mushrif Vs Raju Shetti Sarkarnama
मुंबई

Hasan Mushrif Vs Raju Shetti : ऊस दरवाढीवरून शेट्टींचा एल्गार; तर मुश्रीफ म्हणतात,"...मला रात्रीची झोप लागत नाही!"

Kolhapur Political News : " आम्ही शेट्टींना कोल्हापुरातील साखर कारखाने हे..."

Deepak Kulkarni

Mumbai News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी राज्य सरकार आणि कारखान्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. गतवर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा, यासाठी 522 किलोमीटरची आक्रोश पदयात्रा करून या पदयात्रेची सांगता मंगळवारी जयसिंगपुरातील ऐतिहासिक विक्रमसिंह मैदानावर झालेल्या 22 व्या ऊस परिषदेत करण्यात आली.

माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या परिषदेत 400 रुपये दुसरा हप्ता मिळाल्याशिवाय जागेवरून हटणार नसल्याचा निर्धार करत पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याचदरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ आणि राजू शेट्टी यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्याच टीकेवर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, आम्ही शेट्टींना कोल्हापुरातील साखर कारखाने हे उसाला सगळ्यात जास्त आणि एकरकमी एफआरपी देणारे कारखाने आहेत. या कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिल्यामुळे त्यांच्यावर फार मोठा कर्जाचा बोजा आहे, असे सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच तीन ते चार महिन्यांपूर्वी साखरेचे दर वाढले आहेत.आपले कारखाने जर एफआरपी कायदा पाळत असतील, विनाकपात एकरकमी पैसे देत असतील, प्रॉफिट शेअरिंगचा कायदा पाळत असतील तर दर वेळी साखरेचे दर वाढले म्हणून असं आंदोलन करणं योग्य नाही.

मुश्रीफ म्हणाले, मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आहे. कारखान्यावरील कर्ज इतकं वाढलं आहे की, मला आता रात्रीची झोप लागत नाही. एकरकमी एफआरपी दिल्यामुळे कारखान्यांना वारंवार कर्ज काढावं लागलं आहे. दुसऱ्या बाजूला तीन-चार महिन्यांपूर्वी साखरेचे दर वाढले आहेत. केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीमुळे साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा फटका या कारखान्यांना बसत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, राज्याच्या सीमेवर, कर्नाटकमध्ये, सांगली, सातारा आणि इतर ठिकाणी साखर कारखाने सुरू आहेत. इतर ठिकाणी २,८०० रुपये भावाने ऊसखरेदी सुरू आहे. परंतु,आंदोलनामुळे आमच्या जिल्ह्यातले साखर कारखाने बंद आहेत, हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.

राजू शेट्टी काय म्हणाले होते...?

माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदरासाठी काढलेल्या आक्रोश पदयात्रा समारोप झाला. त्यानंतर झालेल्या 22 व्या ऊस परिषदेत शेट्टी यांनी राज्य सरकार, साखर कारखानदार यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफांवरही हल्लाबोल केला होता. ते म्हणाले, हसन मुश्रीफ सांगतात, शेट्टींची मागणी चुकीची आहे; पण त्यांच्याकडून आम्हाला असली अपेक्षा नव्हती. मात्र, त्यांच्या या बोलण्याचा अर्थ असा की, मंत्री मुश्रीफदेखील पैसे हाणणाऱ्यांपैकी एक झालेले आहेत, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

महादेव अ‍ॅपवरील टीकेवर मुश्रीफ म्हणाले...

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महादेव अ‍ॅपवरून सरकारला निशाणा साधला होता. त्यांनी महाराष्ट्रात अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हेसुद्धा महादेव अ‍ॅपचे सदस्य आहेत. भाजप या नेत्यांना तुरुंगात डांबणार होती.

परंतु, आता पूजा करत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पवार-भुजबळ-मुश्रीफांवर फुलं उधळत आहेत.

या टीकेवर मुश्रीफ म्हणाले, हे महादेव अ‍ॅप काय आहे तेच मला माहिती नाही. मी संजय राऊतांना भेटलो तर त्यांच्याकडून याची माहिती घेईन. तसेच महादेव अ‍ॅप काय आहे ते जाणून घेईन, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT