Mumbai News : भाजपने लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांचं मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून तिकीट कापत मोठा धक्कातंत्र वापरलं होतं. महाजन या 2014 पासून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ती खरीही ठरली. त्यांच्या जागी ज्येष्ठ वकील उज्जवल निकम यांनी तिकीट देण्यात आलं होतं.
पण एकीकडे लोकसभेला पराभूत होऊनही विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आल्यानंतर पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचं पुनर्वसन कसं करणार याची जोरदार चर्चा झडू लागली आहे. त्यातच आता महाजन यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं टेन्शन वाढवलं आहे.
महाराष्ट्र सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना माजी खासदार आणि भाजप नेत्या पूनम महाजन यांनी धक्कादायक विधान केलं आहे.लोकसभेला तिकीट कापल्यानंतर आता महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
तसेच महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल, त्यामुळेच माझं खासदारकीचं तिकीट कापण्यात आलं, असं वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांचा निशाणा नेमका कोणावर आहे,याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन म्हणाल्या,काँग्रेसचा बालेकिल्ला भेदून आम्ही मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला तयार केला.पण यंदाच्या निवडणुकीत माझं तिकीट कापण्यात आलं,ते का कापण्यात आलं याची माहिती अद्याप मला देण्यात आली नाही. मी राज्यात काम केलं आहे. मी दिल्लीत काम केलं आहे. संपूर्ण देशात मी पक्षाचं काम केलं आहे असंही त्यांनी म्हटलं.
तसेच पक्षातील कुणीही वरिष्ठ नेत्यांनी तुम्ही इथं चुकलात,ही चुकीची गोष्ट केली असं म्हटलेलं नाही. कोणी माझ्यावर आक्षेपदेखील घेतलेला नाही.त्यामुळे महाराष्ट्रात कोणाला तरी माझं काम आवडत नसेल, म्हणूनच माझं तिकीट कापण्यात आल्याचा खळबळजनक दावा पूनम महाजन यांनी केला आहे.
पूनम महाजन यांनी भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्या ट्विटमध्ये म्हणतात,गेल्या दहा वर्षांपासून एक खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी देण्यात आली.त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील त्यांनी ट्विटमधून मानले होते.
तसेच मला एक खासदार म्हणून नव्हे तर एक मुलगी म्हणून स्नेह दिल्याबद्दल मतदारसंघातील कुटुंबा समान जनतेची मी सदैव ऋणी राहील.आणि हे नातं कायम राहील अशी आशा आहे असेही त्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या.
माझे आदर्श, माझे वडील स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी मला राष्ट्र पहिलं,नंतर आपण ही शिकवण दिली आहे.आजीवन याच मार्गावर मी चालेल अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते.माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण सदैव देश सेवेसाठी समर्पित राहील, अशा शब्दांत आपल्या भावनांना पूनम महाजन यांनी वाट मोकळी करुन दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.