Pune News : राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. सर्वत्र प्रचार सभांचा धुराळा उडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुक्रवारी धुळे येथे पहिली प्रचार सभा घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तब्बल 12 सभा राज्यभर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासोबतच 12 तारखेला ते पुण्यात देखील सभा घेणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या प्रचारासाठी मोदी बारामतीमध्ये जाणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार का? याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, जेव्हा मोठे नेते येतात तेव्हा ते जिल्ह्याच्या ठिकाणी सभा घेतात. तालुक्याच्या ठिकाणी त्यांची सभा होत नाही. जिल्ह्यातील सभेला आजूबाजूचे लोक येतात मतदार येत असतात.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची धुळ्यामध्ये सभा झाली. त्यानंतर नाशिकमध्ये सभा होत आहे आणि पुढे पुण्यात देखील होणार आहे. त्यामुळे बारामती देखील पुणे जिल्ह्यातच येते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सभा ज्याप्रमाणे लोकसभेला पुण्यात झाली, त्याच पद्धतीने आजूबाजूच्या उमेदवारांसाठी ही सभा असणार असल्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.
2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये सभा घेतली होती. याबाबत विचारला असता अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती तिथे अजित पवार नावाचा माणूस उभा होता आणि त्याला पराभूत करण्यासाठी ती सभा घेण्यात आली होती. आता मोदींना त्यांना पराभूत करायचे नसून त्यांना निवडून आणायचे आहे. त्यामुळे त्यांनी सभा घेतली नाही, असे अजित पवार म्हणाले.
बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील किंवा इतर भाजपचे नेते प्रचारासाठी येणार आहेत का? असे विचारलं असता अजित पवार म्हणाले, 'मी माझ्याकडे कोणी येऊ नका, असे सांगितले आहे. बाकीच्या 287 मतदारसंघांमध्ये खूप काम आहे. बारामतीमधील जी काही वेळ आहे ती इतर ठिकाणी कामी आणण्यास सांगितली आहे. मी माझी सभा घ्यायला आणि प्रचार करायला सक्षम आहे, असे अजित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.