Pradeep Purnekar Meenakshi Shinde Rajendra Shinde  Sarkarnama
मुंबई

Thane Crime Branch: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: 'क्राईम ब्रँच'कडून तातडीचं बोलावणं, मिनाक्षी शिंदेंच्या पतीनं लगबगीनं गाठलं पोलिस स्टेशन

Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी त्यांचं कुटुंब तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्यापासून ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही हत्या शिंदे पती-पत्नीनेच सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांनी केल्याचा आरोप केला आहे.

Deepak Kulkarni

Thane News : ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येवरुन आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरणही ढवळून निघालं.ठाणे गुन्हेशाखेनं या हत्याप्रकरणाचा तपासात प्रचंड वेग घेतला असून मुख्य आरोपी संतोष कनोजिया याला प्रयागराजमधून उचलल्यानंतर आणखी एक मोठी अॅक्शन घेतली आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी त्यांचं कुटुंब तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्यापासून ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही हत्या शिंदे पती-पत्नीनेच सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांनी केल्याचा आरोप केला आहे. त्यांचीही चौकशीची जोरदार मागणी करत मोठा मोर्चाही ठाण्यात काढण्यात आला. यानंतर तपासानं वेग घेतला असून अचानक ठाणे क्राइम ब्रँचनं राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावून घेतलं.

ठाणे गुन्हे शाखेने मंगळवारी(ता.13) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या व ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अचानक चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात त्यांची पूर्णेकर हत्या प्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

या पुढील महत्त्वाची अपडेट म्हणजे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींनाही ठाणे गुन्हे शाखेनं याच कार्यालयात आणलं आहे. ठाण्यासह राज्याचं राजकारण हादरवणाऱ्या या पूर्णेकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना समोरासमोर बसवत पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

राम पूर्णेकर यांनी नुकताच माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळत नाही,तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं होतं. न्यायासाठी गरज पडल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. आता या इशार्‍यानंतर अवघ्या 24 तासांतच ठाणे गुन्हे शाखेने मीनाक्षी शिंदे यांच्या पतीला चौकशीसाठी बोलावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

संतोष कनोजिया या मुख्य आरोपीसह पाच संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणापाठीमागच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.आता राजेंद्र शिंदे आणि पाच आरोपींची समोरासमोर सुरू असलेल्या चौकशीतून प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे, संजय राऊत हे स्वतः पोलिस ठाण्यात बसून होते. अखेर पुरवणी आरोपपत्रात मीनाक्षी शिंदे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. एकीकडे पूर्णेकर हत्या प्रकरणात आरोप होत असताना मीनाक्षी शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत घेत सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच दिशा सालियान प्रकरणाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर प्रहार करत त्यांच्या अटकेची मागणी केली.

मिनाक्षी शिंदे यांनी प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणावर रोखठोक भाष्य केलं होते. त्यांनी 'उद्या तुम्हावर कोणावर ही आरोप कराल, याच्यासाठी पुरावे द्यावे लागतात. पुरावे नसताना हे आरोप करणे हे राजकारण आहे, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. या हत्येनंतर मी पुढे येऊन दोन दिवस काही बोलले नाही,कारण हा संवेदनशील विषय आहे. पोलिस या प्रकरणात चौकशी करत आहेत, आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत. माझ्या पतीची, माझी चौकशी होणार आहे. त्याला आम्ही सामोरे जाऊ.', असंही त्यावेळी स्पष्ट केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT