Delhi News : शरद पवारांचा अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पातळीवर भक्कमपणे बाजू मांडणारा नेता म्हणून प्रफुल पटेलांकडे पाहिले जात होते.त्यांना पवारांनी सुप्रिया सुळेंसोबत अतिशय महत्त्वाची आणि सर्वोच्च जबाबदारी सोपवताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवडही केली.
पण राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार प्रमुख नेत्यांसह 40 हून अधिक आमदारांना सोबत घेऊन थेट महायुती सरकारमध्ये सामील झाले. यासगळ्या घडामोडींपाठीमागे खासदार प्रफुल पटेलच मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. आता याच पटेलांनी सर्वात मोठं विधान करुन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी शनिवारी (ता.27) मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी आजच बाबाजानी दुर्राणी यांच्या शरद पवार गटातील प्रवेशासह विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केले. याचवेळी त्यांनी आरक्षणावरही आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही असेही ते म्हणाले.
तसेच पटेल यांनी आरक्षणाला जर धक्का लागेल तर नक्कीच मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. आरक्षणाला धक्का लागणार असेल तर मग या पदाचा आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही, म्हणूनच मी त्याग करेल अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या त्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह राजकीय क्षेत्रात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पटेल म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून उगीचच संविधान बदलणार आणि आरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. लोकं या अपप्रचाराला बळी पडलेत.पण आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की,आमच्यासारखे अनेक जे कोणी संसदेत संविधानाची शपथ घेऊन बसलेली आहेत ते असं होऊ देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात धुमसत असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठ्यांना आरक्षण मिळालंचं पाहिजे. हा प्रश्न कालचा, आजचा नाही फार जुना आहे. वर्षानुवर्षी या समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. पण ज्यांच्याकडून मागणी होत आहे त्या समाजाचे खंबीर नेतृत्व अनेकवेळा महाराष्ट्रात राहिलेले आहेत.अनेक पक्षात राहिलेले आहेत. मात्र, त्यांनी आजपर्यंत आरक्षण नाही दिलं नसल्याची टीकाही खासदार पटेल यांनी यावेळी केली.
पण महायुती सरकारच्या काळात मराठा आरक्षणाविषयीच्या दृष्टीने विधानसभेत विधेयक पारित झाले, कायदाही बनला आहे. आणि दहा टक्के आरक्षणसुध्दा दिले आहे. आता ज्यांना तेही पटत नाही,ते विरोधाभास करतात. काँग्रेस, आमची पूर्वीची राष्ट्रवादी आणि सर्वच पक्ष हे अनेक वर्ष सत्तेत राहिले. त्यांनी काहीच केलं नाही असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.