Prakash Ambedkar  Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election : ...तर 'वंचित' लोकसभेच्या सर्व जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांचा 'मविआ'ला इशारा

सरकारनामा ब्यूरो

Vanchit Bahujan Aghadi News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडी लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करेपर्यंत वंचित बहुजन आघाडी सर्व जागांवर म्हणजेच ४८ जागांच्या उमेदवारांची घोषणा करेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

देशाला वर्षभरापासून लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी भाजपप्रणित 'एनडीए' आणि विरोधकांची 'इंडिया' आघाडी यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ महिन्यांपूर्वी युती केली आहे. यंदा २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत युतीची घोषणा केली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होईल तसेच 'इंडिया' आघाडीमध्येही 'वंचित'ची एन्ट्री होईल, अशी चर्चा होत होती. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती.

काल मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यात येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यावर तसेच पक्षाच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या जागांची घोषणा होण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व जागांची घोषणा करेल, असे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधकांनी भाजप आणि आरएसएस विरोधात एकत्र यायला हवे, हे सांगतानाच आता जागावाटपाचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोर्टात असल्याचे सांगायला आंबेडकर विसरले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गट आणि 'वंचित'ची युती आहे तर ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये आहे. महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्याने ठाकरे गटाने अद्याप आमच्याशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने जागावाटपाचा निर्णय लवकर घेतला नाही तर आम्हाला नाईलाजाने लोकसभेच्या ४८ जागांचे उमेदवार जाहीर करावे लागतील, असा स्पष्ट इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे कल पाहता भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची मोट बांधताना आता महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सामावून घेणार का, हाच खरा प्रश्न आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा इशारा काँग्रेस किती गांभीर्याने घेणार, हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT