Prakash Shendge Sarkarnama
मुंबई

Maratha Vs OBC : असंच कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नका; जरांगेंच्या मागणीवर प्रकाश शेंडगे स्पष्टच बोलले

Prakash Shendge On Kunabi : ओबीसी समाजाच्या एल्गारपूर्वीच राज्यातील वातावरण तापणार

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यातून राज्यात मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने ठाकल्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांनी अभूतपूर्व सभा पार पडली. या पार्श्वभूमीवर अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेपूर्वीच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पडताळणीशिवाय कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी मोठी मागणी केली आहे. (Latest Political News)

ओबीसी समाजाची एल्गार परिषद शुक्रवारी जालना जिल्ह्यातील अंबड येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश शेंडगेंनी राज्य सरकारला मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत मोठे आवाहन केले आहे. सभेबाबत बोलताना शेंडगे म्हणाले, अंबड येथे होणारी ओबीसींची सभा एतिहासिक होणार आहे. या वेळी सर्व ओबीसी नेत्यांसह राज्यभरातील समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. राज्यातील ओबीसी समाज आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकवटणार आहेत, असेही ते म्हणाले.

कुणबी नेमके कोण, हे सांगताना प्रकाश शेंडगे म्हणाले, 'जो शेतकरी तो कुणबी, अशी आरक्षणाची व्याख्या आहे. मराठा नेत्यांच्या मागणीनुसार सरकारने कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी शोधणे सुरू केलेले आहे. यात आता जैन, मारवाडी समाजातील काही लोकांच्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या आहेत. त्यांना आता ओबीसीत समावेश करणार आहे का, असा माझा मराठा नेत्यांना प्रश्न आहे. तसे झाले तर संपूर्ण देशच ओबीसी आरक्षणात येणार आहे,' असेही शेंडगे यांनी या वेळी स्पष्ट केले.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्याने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. राज्यातील कुणबींच्या नोंदी तपासणीचे काम माजी न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वातील समिती करत आहे. यावर शेंडगेंनी सांगितले, 'आता जी जात पडताळणीची प्रक्रिया आहे, त्यात ज्यांच्या नोंदी सापडतील ते कुणबी असतील. मात्र, पडताळणी झाल्याशिवाय कुणाचाही ओबीसी समाजात समावेश करू नये, अशी आमची मागणी आहे.'

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलेल्या या मागणीमुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंबड येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेत कोण काय बोलणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT