Pruthviraj Chavan Sarkarnama
मुंबई

Karad Bazar Samiti : कराड बाजार समितीच्या विजयाचा गुलाल घेऊनच पृथ्वीराज चव्हाण कर्नाटकला रवाना

Congress : काँग्रेसच्या विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलला १२ जागांवर वर्चस्व

सरकारनामा ब्यूरो

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मतदांरांनी कराड कृषी उत्पन्न समिती काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या ताब्यात दिली आहे. या बाजार समितीच्या विजयाचा गुलाल घेतल्यानंतर चव्हाण हे काँग्रेसच्या प्रचारासाठी कर्नाटक राज्याकडे रवाना झाले.

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांची अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून देशात ओळख आहे. त्यातूनच चव्हाण यांची कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून नेमणूक केली आहे. काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या देशभरातील ४० दिग्गज काँग्रेस नेते कर्नाटक (Karnataka) विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार आहेत. दरम्यान, कराड येथील बाजार समितीसाठी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप गटाचे पॅनल समोरासमोर होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. ही बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

दरम्यान, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीची (Karad APMC) निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार चव्हाण यांनी या निवडणुकीत पूर्ण वेळ देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी काँग्रेस पुरस्कृत लोकनेते कै. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलचा प्रचार केला. प्रचारादरम्यान, एका सभेत त्यांनी या बाजार समितीसाठी तयार केलेली राष्ट्रवादी (NCP) आणि भाजप (BJP) पुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडवा, असे आवाहन केले होते.

चव्हाण म्हणाले होते की, "बाजार समिती स्वातंत्र्यापूर्वी निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही संस्था निर्माण झाली. शामराव पाटील हे पहिल्यांदा सभापती झाले. त्यानंतर विलासकाकांनी बाजार समितीच्या प्रगतीसाठी घाम गाळला. मात्र, कराड तालुक्यातील विशिष्ट लोकांनी आयुष्यभर केवळ संस्था बळकावल्या. यातून त्यांनी स्वतःचे आर्थिक विश्व उभे केले. अशा लोकांच्या हातात कराडची बाजार समितीची सत्ता द्यायची का ? विरोधकांनी दुष्ट व अभद्र युती उधळून लावा."

या बाजार समितीसाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. त्यामुळे कराड तालुक्यात जिल्हा परिषद गटनिहाय मतदारांच्या मेळाव्यात आमदार चव्हाण यांनी या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीसारखी रंगत आणली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आमदार चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलने १२ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवीत विजय खेचून आणला.

आता या निवडणुकीचा गुलाल घेऊनच ते कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी गेले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT