Prithviraj Chavan Sarkarnama
मुंबई

Prithviraj Chavan : विधान परिषद निवडणुकीत पराभव का झाला? पृथ्वीराज चव्हाणांनी सगळंच सांगितलं...

Akshay Sabale

काँग्रेसच्या मतांमध्ये झालेली फाटाफूट आणि महाविकास आघाडीच्या छोट्या घटक पक्षांसह बहुसंख्या अपक्ष आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मदत केल्यानं विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीच्या डॉ. प्रज्ञा सातव यांनीही विजय मिळवला.

पण, अकराव्या जागेसाठी महाविकास आघाडीतीलच शिवसेनेचे ( ठाकरे गट ) मिलिंद नार्वेकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यात नार्वेकर यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर पाटील यांच्यावर मात केली.

या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची मते फुटणार असल्याची चर्चा होती. पण, काँग्रेसची 6 ते 7 मते फुटल्यानं शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामोरे जावं लागलं असल्याचं बोललं जात आहे. पण, विधान परिषद निवडणुकीत नेमका पराभव कशामुळे झाला? याचं विश्लेषण माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते एक वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) म्हणाले, "आमच्या पक्षात मोठी फूट पडल्यानं आमचं संख्याबळ कमी झालं. काँग्रेसचे दिग्गज नेते आम्हाला सोडून भाजपत गेले होते. या परिस्थितीत तीन उमेदवारांसाठी आमच्याकडे पर्याप्त मते नव्हती. ही मते आम्ही मिळतील, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र, पक्ष सोडून गेलेल्यांनी आम्हाला समर्थन दिलं नाही. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. ही लढाई लढायची होती. भ्याडपणाने दोनच जागा उभ्या केल्या असत्या, तर निवडणूक बिनविरोध झाली असती."

प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 25 मते मिळाली. ते गणित कसं जुळवलं? असा प्रश्न विचारल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं, "गणित कसं जुळवलं हे मी सांगणार नाही. ते गुप्त असते. आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. पक्ष सोडणाऱ्यांनी तुमच्याबरोबर असल्याचं सांगितलं. मात्र, निश्चित मते अपेक्षित होती ते मिळाली नाहीत. हा सर्व अहवाल दिल्लीतील महासचिवांना पाठवला आहे."

"जयंत पाटील यांना 12 मते पडली होती. प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर यांना प्रथम पसंतीची मते दिली. जयंत पाटलांना तिसऱ्या पसंतीची मते दिली. प्रथम पसंतीची मते त्यांना मिळाली नाहीत," असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT