Fadnavis government decision : विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर तीन दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यंमत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक, वक्फ व क्रीडा खाती त्यांच्याकडे देण्यात आली. अजित पवार हे पुण्यासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद कोणाकडे सोपविले जाणार, याबाबत चर्चा सुरू होत्या.
राज्य सरकारने मंगळवारी पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबतचा आदेश काढला आहे. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेही दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बीडमधील वादग्रस्त घटनांनंतर अजित पवार यांनी आपल्याकडे या जिल्ह्याचे पालकत्व घेतले होते. त्यानंतर त्यांचे या जिल्ह्यातील दौरे वाढले होते.
बीडसह पुणे जिल्ह्यातील गुन्हे हद्दपार करण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न सुरू केले होते. बीडला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अजितदादांनी कंबर कसली होती. पण त्यांच्या अकाली निधनाने दोन्ही जिल्हे पोरके झाले होते. आता अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्याकडे फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्रिपदही होते. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद देण्यात आलेले नाही. अजितदादांकडे असलेली उर्वरित सर्व खाती देण्यात आली आहे. याबाबत आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्याने अर्थ खातेही सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविले जाईल, असा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
सहकारी संस्थांचे नामकरण
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे आज नामकरण करण्यात आले. यापुढे या संघाच्या नावापुढे अजितदादा पवार हे नाव असेल. कालच कात्रज दुध संघाचेही नामकरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहराचे अजितनगर असे नामकरण करण्याची मागणी पुढे आली आहे. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेलाही अजितदादांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.