Raghav Chadha faces criticism in Saamana editorial amid BJP controversy and AAP MP defection debate, highlighting Indian democracy concerns. Sarkarnama
मुंबई

Raghav Chadha controversy : "भाजपने फोडलेले 'आप'चे खासदार हवेतले बुडबुडे, पंजाबच्या निवडणुका जिंकता येतील हा त्यांचा भ्रम..."

Shivsena UBT on Raghav Chadha : 'मोदी-शहा एकीकडे प. बंगालातील प्रचारात नैतिकतेवर भाषणे देत आहेत आणि दुसरीकडे दिल्ली व पंजाबात विरोधी पक्षांचे खासदार फोडत आहेत. मित्तल यांनी मनी लॉण्डरिंग केले, भ्रष्ट मार्गाने त्यांचे विद्यापीठ चालविले म्हणून ‘ईडी’ त्यांच्या घरात घुसली. आता मित्तल हे भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्येच घुसल्याने सर्व डाग धुतले गेले.'

Jagdish Patil

Mumbai News, 27 Apr : 'भारतीय संसदीय लोकशाहीचे आणखी किती अधःपतन पाहायला लागणार आहे?' असा सवाल कर ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाजप आणि आम आदमी पार्टीतून बाहेर पडलेले राघव चड्ढा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सामनात लिहिलं की, 'राघव चड्ढांसह सात राज्यसभा खासदार ‘आप’चा त्याग करून भाजमध्ये सामील झाले. चड्ढा यांच्यासोबत गेलेल खासदार अशोक मित्तल यांच्या शैक्षणिक संस्थांवर, उद्योगांवर ईडीचे छापे पडले. हे छापे का टाकले, त्याचा आता उलगडा झाला. मित्तल यांनी चड्ढा यांच्या गटात सामील होऊन भाजपमध्ये यावे यासाठी ईडीचे हत्यार वापरले गेले.

मोदी-शहा एकीकडे प. बंगालातील प्रचारात नैतिकतेवर भाषणे देत आहेत आणि दुसरीकडे दिल्ली व पंजाबात विरोधी पक्षांचे खासदार फोडत आहेत. मित्तल यांनी मनी लॉण्डरिंग केले, भ्रष्ट मार्गाने त्यांचे विद्यापीठ चालविले म्हणून ‘ईडी’ त्यांच्या घरात घुसली. आता मित्तल हे भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्येच घुसल्याने सर्व डाग धुतले गेले. राघव चड्ढा तर कालपर्यंत ‘भाजप म्हणजे गुंडांचा पक्ष’ असल्याचा बोभाटा करीत होते.

भ्रष्ट व गुंडांच्या पक्षाने देशाची वाट लावली असल्याचे चड्ढांचे म्हणणे होते. आता त्याच गुंडांच्या पार्टीत चड्ढा सामील झाले व भाजपचे अध्यक्ष नबीन यांनी चड्ढा यांना पेढा भरवला. भारतीय लोकशाहीतील निर्लज्जपणाचा हा कळस आहे,' अशा शब्दात सामनातून भाजपवर टीका केली आहे.

दहाव्या अनुसूचीत स्पष्ट लिहिले आहे की, कोणत्याही प्रकारची फूट, मग तो आकडा दोन तृतीयांश असला तरी त्यास घटनेची मान्यता नाही. त्यामुळे आम आदमी पक्षातल्या सात खासदारांची फूट गैरसंविधानिक ठरते. हे झाले घटनेच्या पुस्तकातले भाष्य, पण सध्याचे मोदी-शहांचे सरकार, त्यांचा निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, राज्यसभेचे सभापती हे घटनेतील या कलमांचा सन्मान करतात काय, तर ‘नाही’ असेच उत्तर द्यावे लागेल, असंही सामनात लिहिलं आहे.

तर, भाजपने राज्यसभेतील ‘आप’चे जे खासदार फोडले ते हवेतले बुडबुडे आहेत. व्यापारी, उद्योगपती असे हे लोक. त्यांचा जनतेशी संबंध नाही. राघव चड्ढा हे प्रकरण ‘पेज थ्री’चे आहे. ते तेवढ्यापुरतेच राहील. या सगळ्यांमुळे भाजपला पंजाबातील विधानसभा निवडणुका जिंकता येतील हा भ्रम आहे. पंजाबातील एक प्रमुख नेते व काँग्रेसचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सुनील जाखड यांच्यासारखे नेतेही भाजपला विजय मिळवून देऊ शकले नाहीत, पण भारतीय जनता पक्षाची राजकीय भूक ही भस्मासुर आणि बकासुराची आहे.

दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या नावाखाली मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांना मोदी-शहांनी तुरुंगात पाठवले. याच आरोपपत्रात राघव चड्ढांचेही नाव होते, पण ते अटक टाळण्यासाठी पत्नीसह लंडनला पळून गेले. लंडनवरूनच मोदी परिवाराशी सौदा करून भारतात परतले व आता ‘आप’पासून अलिप्त झाले. ‘आप’मधले हे सर्व पळपुटे विविध भ्रष्टाचाराच्या खटल्यांतले आरोपी आहेत. हे कारनामे ईडी व इतर तपास यंत्रणांनी कागदोपत्री नमूद केले आहेत.

त्यामुळे ‘आप’मधला भ्रष्टाचाराचा एक प्रवाह भाजपच्या दुसऱ्या भ्रष्ट प्रवाहात सामील झाला, इतकेच. मिंधे, चड्ढा, मित्तल यांना विशेष राजकीय चारित्र्य नाही. भाजप तर याबाबतीत चारित्र्यहीन बनला आहे. सध्याच्या राजकारणाला कोणतेच चारित्र्य नाही. हेच भारताचे चारित्र्य बनले आहे. जोपर्यंत दाणे टाकले जात आहेत, तोपर्यंत असे ‘राघू’ उडतच राहतील. उडू द्या, अशा शब्दात सामनातून चड्ढा यांच्यासह भाजप आणि शिंदेसेनेवर हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT