Mumbai, 10 March : अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अर्थमंत्री, राज्यमंत्री आणि संबंधित विभागाचे सचिव उपस्थित नसल्याने विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहातच सरकारचे कान टोचताच विधानसभा अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. ‘राज्याच्या ‘ब्युरोक्रसी’ला ही शेवटची संधी देत आहे. यापुढे अधिकारी उपस्थित राहिले नाही तर योग्य उपाययोजना करण्यासाठी हे सभागृह सक्षम आहे,’ अशा शब्दांत राहुल नार्वेकर यांनी नोकरशाहीला सुनावले.
ॲड नार्वेकर म्हणाले, ज्येष्ठ सदस्य दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेसंदर्भात काही बाबींवर सभागृहाचे लक्ष आकर्षित केलेले आहे. त्यासंदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की, सोमवारी (ता. ०९ मार्च) महिला दिनासंदर्भात चर्चा घेणे आवश्यक होते. सर्व सदस्यांची तशी भावना होती. त्यामुळे त्या चर्चेला प्राधान्य देणे आवश्यक होतं. ती चर्चा सोमवारी दुपारी साडेचारपर्यंत चालली. काल काही लक्षवेधी प्रलंबित असतानाही आपण त्या न घेता अर्थसंकल्पावरील चर्चेला आपण प्राधान्य दिले.
अर्थसंकल्पावर सोमवारी पावणे सहा तास चर्चा झाली. सोमवारी रात्री अकरा वाजून १३ मिनिटांपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू राहिलं. आजही आपण प्रश्नोत्तरे आणि अर्थसंकल्पावरील चर्चा घेणार आहोत. आजच्या दिवशी एकही लक्षवेधी घेतलेली नाही, असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, पीठासीन अधिकारी म्हणून अर्थसंकल्पावरील चर्चेचे गांभीर्य मला आहेच. पण सरकारचीही तीच भूमिका आहे, असं मला त्यांनी कळविलेले आहे. तुमच्या सर्वांच्या सहकाऱ्यातून मी वेळेचे नियोजन करू शकतो. यापुढे सभागृहाचं सहकार्य मला मिळेल. जेणेकरून महत्वाच्या विषयाला आपण योग्य वेळ देऊ शकू.
ज्येष्ठ सदस्य वळसे पाटील यांनी दुसरी बाब जी मांडली आहे. चर्चेवेळी सभागृहात संबंधित मंत्री नसले तरी चार कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित आहेत. ते योग्य ती नोटिंग करत आहेत. अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना योग्य ती नोटिंग कळवतीलच, असे मत नार्वेकरांनी व्यक्त केले.
अधिकाऱ्यांसंदर्भात वळसे पाटील यांनी जी भूमिका मांडली, त्याच्याशी मी १०० टक्के सहमत आहे. अदृश्य गॅलरी असली तरी त्या गॅलरीमध्ये संबंधित विभागाचे सगळे वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. यापूर्वीही पत्राद्वारे मी अधिकाऱ्यांना कळविलेले आहे. राज्याच्या ‘ब्युरोक्रसी’ला ही शेवटची संधी देत आहे. यापुढे महत्वाच्या चर्चेच्या वेळी ‘एसीएस’ लेवलचे अधिकारी गॅलरीत नसतील तर त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी हे सभागृह सक्षम आहे. याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असा इशारा राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना राहुल नार्वेकर यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.