Mumbai News : महाराष्ट्रात महायुती सरकार दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा सत्तेत विराजमान झाले आहे. सत्तास्थापना झाल्यानंतर विधानसभेचे मुंबईत विशेष तीन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. त्यात 7 आणि 8 डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची निवड करण्यात आली.
भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे. याच नार्वेकरांनी आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) विरोधी पक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
बहुमताचा मोठा आकडा असलेले महायुती सरकार राज्यात स्थापन झाले असून,त्यामुळे विरोधकांचा आवाज दबला जाईल,अशी भीती महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतरच्या भाषणात व्यक्त केली होती. त्यावर विरोधी पक्षांची संख्या जरी कमी असली,तरी तुमचा आवाज कमी होणार नाही, याची जबाबदारी माझी असेल, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली होती.त्याचाच प्रत्यय त्यांनी विरोधी पक्षांसह युतीसरकारलाही करुन दिला.
विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी नि:पक्षपातीपणा घेतलेल्या निर्णयामुळे सत्ताधारीसह विरोधकांचीही मनं जिंकली.नार्वेकर यांनी विरोधी पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसतानाही कामकाज सल्लागार समितीवर त्यांच्या 4 सदस्यांची नियुक्ती केली आहे.
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीवर एकूण 12 सदस्य असतात. कमीत कमी 22 सदस्य असलेल्या पक्षाचाच एक सदस्य या समितीवर नेमला जातो.पण यावेळी विरोधकांकडे तितकंसं संख्याबळ नाही. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षांनी विरोधीपक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनिल प्रभू,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची या समितीत नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली. यानंतर राहुल नार्वेकर यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.