Raj Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : मनसेसाठी मोठी बातमी! शरद पवारांचा सल्ला मानला; राज ठाकरे सकाळी झोपेतून लवकर उठले...

Dnyanesh Savant

Mumbai Political News : राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची, मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता पहाटे लवकर झोपेतून उठायला लागले आहेत. त्यांनी याची सुरुवात महात्मा गांधीजींच्या जयंती दिनापासून म्हणजे २ ऑक्टोबरपासून केली आहे. त्यांनी सोमवारी सकाळी लवकर पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली.

राज यांनी काही वर्षांनंतर का होईना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला मानला, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राजकारण हे पूर्णवेळ करायचे असते, हे ठाकरेंना अखेर कळले, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये असून, मनसेच्या गोटात उत्साहाचे वातावरण असणार आहे. (Latest Political News)

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी बैठक घेतली. त्यामध्ये लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या वेळी झालेल्या बैठकीत मुंबई-ठाण्यातील सात लोकसभा मतदारसंघांसह पुणे, नाशिकमधील मतदारसंघांबाबत चर्चा झाली. त्यानंतर लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे मनसे आता महायुतीच्या मिशन ४५ ला आडवे येणार असल्याचे बोलले जात आहे.

आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीने विरोधकांना सळो की पळो करून सोडणाऱ्या (Raj Thackeray) राज ठाकरेंना शरद पवारांनी जोरदार टोले लगावले होते. मी पहाटे लवकर उठून कामाला लागतो. राजकारण करायचे असेल, तर पहाटे लवकर झोपेतून उठावे लागते, असा सल्लाही पवारांनी दिला होता. पवारांचा हा सल्ला राज ठाकरेंनी आता इतक्या वर्षांनंतर मनावर घेतला का, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.

राज ठाकरे हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी जीव की प्राण; मात्र त्यांचा सातत्याने अपेक्षाभंग होत गेला. राज यांच्या कार्यशैलीबाबत अपवाद वगळता पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचा सूर आढळून येतो. सत्ता नसताना हे कार्यकर्ते त्यांना वर्षानुवर्षे साथ देत आहेत. अनेकांनी घरांवर तुळशीपत्र ठेवून मनसेसाठी काम केले. मात्र, त्यांना राज ठाकरे यांना साधे भेटायचे म्हटले तरी ते शक्य होईल की नाही, याची खात्री नसते. शिवाय आमच्याकडे साहेबांचे दुर्लक्ष असते, अशी तक्रार त्यांची असते. (Maharashtra Political News)

मराठवाड्यात काही पदाधिकाऱ्यांनी पदरमोड करून दुष्काळी भागात विविध कामे केली होती. कौतुकापलीकडे या पदाधिकाऱ्यांना काहीही मिळाले नाही. साहेबांना राजकारण करायचे आहे किंवा नाही, असा प्रश्न पडतो, अशीही भावना काही कार्यकर्त्यांची आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना 'पीए'मार्फत राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचावे लागते. पण पीए वरती निरोपच देत नाहीत, असे प्रसंग घडल्याचे काही पदाधिकारी सांगतात. त्यामुळे मनसेच्या राजकारणावर मरगळ आलेली असते.

राज ठाकरे यांची सभा म्हटले की, विरोधकांच्या मनात धडकी भरते. केवळ आपल्या वक्तृत्वशैलीच्या बळावर गर्दी खेचणारे ते सध्याच्या राजकारणातील राज्यातील एकमेव नेते आहेत. त्यांच्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वशैलीत बरेसचे साम्य आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी केवळ वक्तृत्वशैली असूनच चालत नाही, तर त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कार्यकर्त्यांना वेळ द्यावा लागतो, असे पवारानी सूचवले होते. आता शरद पवार यांचा सल्ला काही वर्षांनंतर तरी मनावर घेऊन राज ठाकरे खरेच पूर्णवेळ राजकारण करणार असतील, वारंवार आपली भूमिका बदलून कार्यकर्त्यांची कोंडी करणार नसतील, तर मनसेला नक्कीच चांगले दिवस येतील.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) वयाच्या ८२ व्या वर्षीही लवकर उठून कामाला सुरुवात करतात. उपमुख्यमंत्री अजित पवारही सकाळी सात वाजता लोकांच्या सेवेत हजर असतात. पवार काका-पुतणे सकाळी लवकरच उठून अनेक विकासकामांची पाहणी करतात. शरद पवारांचा या वयातही उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. राज ठाकरेंनी सोमवारी सकाळी आठ वाजता बैठक घेतली ती नऊला संपली. आता ठाकरेंनी कायमस्वरूपी सल्ला अमलात आणला तर मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पवारांचे आभार मानले पाहिजेत!

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT