Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray on Aurangzeb tomb: ''ती औरंगजेबाची कबर...''; राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात स्पष्टच सांगितलं!

Raj Thackeray latest news : जाणून घ्या, राज ठाकरे यांनी नेमकं औरंगजेबाबात काय म्हटलंय आहे? ; चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीच कामाचे नाहीत, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

MNS on Aurangzeb controversy : मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड तापलेलं होतं. यावरून मोठे वादही उद्वभवल्याचे दिसून आले. यावरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, ''औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे की उडवली पाहिजे. चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीच कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरमधून उतरला की हे देखील उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं? व्हाट्स अॅपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचायचं असेल तर तुम्हाला पुस्तकात डोकं घालावं लागेल. आजकाला इतिहासात कोणीही बडबडायला लागलं, विधानसभेतही बोलतात. खरंतर त्यांचं काही काम नाही.''

''माहिती तरी आहे का औरंगजेब काय प्रकरण होतं? हे बाहेरून आलेले सगळं लोकं, औरंगजेबचा जन्म गुजरातमधला. मग काय त्यांना सोपंच आहे, तुम्हाला इतिहासावरून जातीपातीत भडकवून द्यायला. हे सगळं बोलणाऱ्यांना इतिहासाशी काहीच संबंध नाही, त्यांना फक्त त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची असते. त्यांना केवळ तुमची माथी भडकावयाची असतात. इतिहासाच्या पानात जर खोलवर गेलात, तर सगळ्या अपेक्षा आणि कल्पनांची भांडी फुटतील.''

३००-४०० वर्षांपूर्वीचा इतिहासावर आम्ही आज जातीवरून भांडतोय -

''छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावर केलेला एक संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला येण्याअगोदर या हिंद प्रांताची काय अवस्था होती? सर्व जातीचे लोक कोणा ना कोणाकडे होतेच ना कामाला? इतिहासातील प्रत्येक गोष्ट ही कागदावर लिहिलेली नाही. त्यावेळी त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील, आपल्याला काय माहिती. ३००-४०० वर्षांपूर्वीचा इतिहास त्यावर आम्ही आज जातीवरून भांडतो आहोत.''

...त्याला शिवरायांचा विचार मारायचा होता -

''मी अनेकदा औरंगजेबाबाबत सांगतिलं आहे, परत एकदा सांगतोय विषय निघाला म्हणून. औरंगजेबाचं राज्य अफगाणिस्तानपासून ते दक्षिणेपर्यंत आणि बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज १६८० साली गेले आणि औरंगजेब महाराष्ट्रात पोहचलाय १६८१ साली. १६८१ ते १७०७ म्हणजे २७ वर्षे तो महाराष्ट्रात लढत होता. छत्रपती संभाजीराजेंसोबत लढला त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी-धनाजी लढले आणि आमच्या ताराराणी साहेब लढल्या. महाराष्ट्राचे एक खूप मोठे लेखक होवून गेले नरहर करुंदकर. त्यांच्या एका पुस्तकात फार अप्रतिम वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. याचं कारण, खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर त्याला शिवरायांचा विचार मारायचा होता. त्याने सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी तो मेला.''

ती सजवलेली कबर काढून टाका -

''जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. त्याचा अभ्यास केला जातो, पण ज्यावेळी त्याचा अभ्यास केला जातो, त्यावेळी जगभरातील लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरात. ती सजवलेली कबर काढून टाका, ती कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला. हा आमचा इतिहास आहे. अफजलखान ज्यावेळी इथे आला आणि प्रतापगडावर मारला गेला, तिथेच खाली त्याची कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला. मराठीत एक फार अप्रतिम शब्द आहे, पुरून उरीन. म्हणजेच तुला पुरीन आणि उरीन. तो जो अफजल खानला तिकडे पुरला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल. त्याची कबर महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल. महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा. जगाला कळू दे कोणाला मारलं आहे. आपण मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मारलंय त्यांची प्रतिकं नेस्तनाबूत करून चालणार नाहीत. जगाला दाखवली पाहिजे आम्ही याला गाडलं आहे. आम्ही कोणाला गाडलंय हे आम्ही जगाला दाखवायचं नाही का?''

लहान मुलांच्या सहली घेवून गेल्या पाहिजेत -

''खरंतर शाळेतील लहान मुलांच्या तिकडे सहली घेवून गेल्या पाहिजेत. बसेस भरून घेवून गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितले पाहिजे. बाळांनो महाराजांनी याला गाडलय. हा आपल्यावर आला होता, हा आपल्या घरावर उलटला होता. हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या माता-भगिनींची अब्रू लुटत होता, याला आम्ही गाडला. नाहीतर मग पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत.''

''माझं महाराष्ट्रातील सर्व तरूण आणि तरूणींना खासकरून सांगणं आहे, व्हॉट्स अॅपवरती इतिहास वाचणं अगोदर बंद करा. इतिहास ज्यावेळी तुम्हाला कुणीतरी जातीतून सांगण्याचा प्रयत्न करेन, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा तो कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाला बांधील असेल. तुमची केवळ माथी भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात. तुम्ही एकत्र येऊच नयेत यासाठी हे प्रयत्न असतात.''

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT