Raj Thackeray News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून कल्याण-डोंबिवली परिचित आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून एकमेकांचे उमेदवार फोडाफोडी सुरू असताना मनसेला देखील मोठा फटका बसला. मनसेचे एकामागून एक पदाधिकारी भाजप आणि शिंदेंची शिवसेना पळवत आहे. त्यामुळी ही गळती रोखण्यासाठी राज ठाकरेंनी भाकरी फिरवली असून मोठे संघटनात्मक बदल केले आहेत.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवारी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये राहुल कामत यांची कल्याण लोकसभा सचिवपदी, मनोज घरत यांची डोंबिवली शहराध्यक्षपदी, कोमल पाटील यांची महिला शहराध्यक्षा म्हणून, तर प्रतिक देशपांडे यांची विद्यार्थी सेना डोंबिवली शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या नेतृत्वामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसे चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेची सुरुवातीपासूनच स्वतंत्र ओळख राहिली आहे. पहिल्याच पालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते, तर त्यानंतरच्या निवडणुकीत ९ नगरसेवक निवडून आले. संख्या कमी असली तरी मनसेने विरोधी पक्ष म्हणून आक्रमक भूमिका घेत आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले.
कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनीही या नगरसेवकांना सातत्याने पाठिंबा देत मनसेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठे धक्के बसताना दिसत आहेत.
मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, त्यांच्या पत्नी सरोज भोईर तसेच सुदेश चुडनाईक यांना भाजपाने आपल्या गोटात घेतल्याने डोंबिवली पश्चिमेतील मनसेची ताकद लक्षणीयरीत्या कमी झाली. त्याच काळात मंदा पाटील, कस्तुरी देसाई, कोमल पाटील आणि मनोज घरत हेही पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेत या माजी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून डॅमेज कंट्रोल केले होते.
प्रकाश भोईर यांचा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसेचे माजी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्यांची पत्नी, माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी आता आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मात्र, राज ठाकरेंनी भाकरी फिरवल्याने मनसेमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पालिका निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल, असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.