Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मशिदींवरील भोंग्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली होती. मनसेनं मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात आंदोलन करत सरकारला अल्टिमेटमही दिला होता. यानंतर आता मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध ठिकाणच्या धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले आहेत. याचवरुन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत कौतुक केले. पण याचवेळी महायुतीतील आमदारांनी ठाकरेंना चिमटाही काढला.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भोंग्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात जाहीररित्या कौतुक केलं. पण याचवेळी टीकेचं टायमिंग साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊतांच्या रोजच्या पत्रकार परिषदांवरुन सकाळच्या दहाच्या भोंग्याचं (संजय राऊत) काय? असा खोचक सवाल केला.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी भोंग्याच्या मुद्द्यावरुन सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कौतुक केले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांनी सगळ्यांशी चर्चा करून सगळे भोंगे काढलेले आहेत. मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो, त्यात काही दुमत नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरे म्हणाले, मात्र, आता गणपती,नवरात्रीचा सण येत आहे.दहीहंडी देखील आहे.या काळात मिरवणुका निघतात. अनेकदा स्थानिक पोलीस स्टेशनमधून तिकडच्या मंडळांना परवानग्या असून देखील सतावले जाते. जर मंडळांकडे सर्व परवानगी असतील आणि जे पोलीस या मंडळांना सतावतील त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी सभागृहात सत्ताधारी पक्षाला केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी उभे राहताच, अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून इतकं चांगलं काम होतं. पण,त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याची देखील माझी तक्रार आहे. याचा देखील तुम्ही विचार करा,असा टोला लगावला. त्यानंतर सभागृह खळखळून हसलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की, आता ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आपल्याकडे कायदा आहे. पण,विचाराच्या प्रदूषणाविरोधातला कायदा आपल्याकडे व्हायचा आहे. तो कायदा झाला की, त्याचा आपण विचार करू, असं उत्तर फडणवीसांनी दिले.
फडणवीस म्हणाले, राज्यातील एकूण 3367 धार्मिक स्थळांवरील भोंगे काढले आहेत.यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी एक एसओपीही तयार केली आहे. तसेच यावेळी मुंबई पोलिसांनी 1621 भोंगे हटवल्याचंही फडणवीसांनी सभागृहात सांगितलं.
भोंगेमुक्त मुंबई करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. त्यामुळे आता यासंदर्भात प्रश्न उपस्थित होणार नाही. कारण आता भोंगे नाहीत.जर असे भोंगे दिसले तर त्या परिसरातील पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. या प्रकरणात जो दंड लावला जाईल, त्यातला अर्धा दंड तक्रारदारांना दिला जाईल,असे त्यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.